बाळासाहेबांना दिलेलं माझं वचन अजूनही अर्धवट- उद्धव ठाकरे

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यातील सध्याचे राजकारण, बंडखोरांमुळे शिवसेनेला बसलेले मोठे धक्के या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची सविस्तर मुलाखत घेतली आहे. आज या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित झाला. या भागात देखील उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर घणाघात केला.

उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीमधील महत्वाचे मुद्दे :-  

मी वर्षा सोडून जात असताना महाराष्ट्राच्या डोळ्यांत पाणी होतं. या अश्रूंची किंमत मला आहे. या अश्रूंची किंमत या विश्वासघातक्यांना चुकवायला लावल्याशिवाय आपल्याला गप्प बसता येणार नाही, गप्प बसू नका असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

मागे मी एका ठिकाणी बोललो होतो की अशी भीती विरोधी पक्षांना वाटायला लागली तर तो त्यांचा कमकुवतपणा आहे. लोकशाहीचा अर्थ म्हणा मग तो कोणताही पक्ष असो, त्यांना सातत्याने विजय प्राप्त झालाय असा नाही. विजय होत असतात, पराजय होत असतात, तेही काही काळ चमकून जातात. पण ही लोकशाहीची हीच वेगळी गंमत आहे. जेव्हा सगळं तुमच्या बुडाखाली ठेवण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण होते तेव्हा विरोधी पक्षांची भीती वाटायला लागते. याने खरं काय फरक काय पडतो. सत्ता येते आणि जाते. काल मी मुख्यमंत्री होतो आज तुमच्यासमोर आहे.

वाजपेयी एकदा म्हणाले होते की सत्ता आती है, जाती है, देश रहना चाहिए. देश राहण्यासाठी आपण एकत्र काम केलं नाही तर आपणच आपल्या देशाचे शत्रू आहोत. आज देशात रुपयांचा नीचांक, महागाईचा उच्चांक याकडे कोणाचंच लक्ष नाहीये.

केंद्रीय यंत्रणांबद्दल न्यायालयानेही आपली मतं नोंदवली आहेत. आजच केजरीवालांनी सांगितलं आहे मनीष सिसोदियांना अटक होऊ शकते. आधी अटक होते मग आरोप होतात मग कालांतराने तो सुटतात. पण तोपर्यंत त्यांचं आयुष्य बरबाद केलेलं असतं. अशा पद्धतीने लोक सुखात राहू शकत नाही.

लोकशाही आहे, तुम्ही बोला मग आम्ही बोलू, पण सध्या जे बदनामीकरण चालू आहे ते अतिशय अशालाघ्य भाषेत चालू आहे. ते कोणाला लाभेल असं वाटत नाहीये.

नितीन गडकरी मागे म्हणाले होते की त्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे. जुन्या लोकांचं जाऊ द्या पण नवीन नवीन लोकांवर आरोप होताहेत. हे सशक्त लोकशाहीचं लक्षण नाही. गेल्या एक महिन्यापर्यंत ज्यांना अटक होईल, ज्यांना फासावर दिलं जाईल अशी परिस्थिती होती ते आता तिथे गेले. तुम्हालाही अटक केली जाणार असं वातावरण निर्माण केलं जातंय, पण तुम्ही हटत नाहीये, आता तुम्ही तिथे गेलात तर पुण्यवान व्हाल. मला तसं सांगण्यात आलं होतं. पण मला पुण्यवान व्हायचं नाहीय, आपण धर्मात्मे आहोत.  म्हणून बाळासाहेब म्हणायचे ना की जो धर्माने मरणार आहे त्याला कर्माने मारू नका. शेवटी प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो.

1977 नंतर जनता पक्षाचं सरकार आलं, ते आपापसात भांडले आणि आपलंच सरकार पाडलं. त्यामुळे एकजूट फार महत्त्वाची आहे. त्यामुळे समजा जर एकत्र यायचं झालं तर कोणीही पदावरून भांडायचं नाही. आपल्या देशात अगदी हुकूमशाही आलेली नाही. ज्या दिशेने ही पावलं पडताहेत ती अनेकांच्या मते बरोबर नाही.

2014 त्यांनी अचानक युती तोडली. गेली 25 वर्षं आपण मित्र होतो. काय मागत होतो आम्ही? मी अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद मागत होतो कारण सरत्या काळात मी बाळासाहेब ठाकरेंना वचन दिलं होतं की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन. तसं पाहिलं तर ते वचन अर्धवटच आहे. कारण मी मुख्यमंत्री होईन असं मी बोललो नव्हतो. ते मला स्वीकारावं लागलं. कारण या सगळ्या गोष्टी ठरवून मग नाकारण्यात आल्या त्यामुळे मला ते करावं लागलं.

फुटीरांचा असा आक्षेप आहे की शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून शिवसेना संपवली. आज जे गावोगावी दिसतंय ते काय आहे? आधी भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देत होतं. आता महाविकास आघाडीला जन्म दिला तर काँग्रेस राष्ट्रवादी त्रास देतंय मग नेमकं हवं काय आहे? माझाही प्रश्न तोच आहे की त्यांना नेमकं हवं काय आहे? लालसा. ते अत्यंत वाईट पद्धतीने त्यांनी मिळवलं आणि आपली तुलना ते बाळासाहेबांबरोबर करायला लागले. मला नाही वाटत भाजपवाले त्यांना पुढे करतील. नाहीतर त्यांची तुलना ते नरेंद्रभाईंबरोबर करतील आणि पंतप्रधानपद मागतील. लालसा इतकी वाईट असते ना.

अडीच वर्षांत मला सत्तेची चटक लागली नाही. कारण एकदा का तुम्हाला ती चटक लागली की तुम्ही कोणाचे नसता आणि कोणी तुमचं नसतं. तेच त्यांचं झालं आज.

बंडखोरांवर ठाकरे म्हणाले की, त्यांनी कितीही म्हणो की मी भेटत नव्हतो, माझे हात पाय हलत नव्हते, भेटू काय शकणार होतो? पण इतर काळात ते माझ्या कुटुंबीयांसारखे होते आणि निधी वगैरे म्हणाल तर अजित पवारांनीच सांगितलं की यांच्या खात्याला 12 हजार कोटी निधी दिला. काही ठिकाणी मी स्थगिती दिली होती. माझी शरद पवार, अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा चालू होती की निधी वाटपात असमानता असेल तर ती सोडवली पाहिजे.

मी परत आमदारांना भेटायला लागलो होतो. एका बाजूला आमदार बसायचे, एका बाजूला प्रशासन बसायचं. मुख्यमंत्री म्हणून मी काही सूचना करायचो, तेव्हा त्यांना विचारायचो की आता कुठे अडलंय तेव्हा ते म्हणायचे की साहेब काही नाही, आता तुम्ही मला भेटत आहात. म्हणून मला तेच वाटतं की तुम्हाला हे करायचं होतं तर डोळ्यात डोळे घालून का बोलला नाहीत? म्हणजेच तुमच्या मनात पाप होते.

सुरत जाण्यावर रउद्धव ठाकरे म्हणाले की,  कशासाठी? माझ्या मनात थोडीच पाप होतं? म्हणूनच मी त्यांना बोलावलं होतं. दोन तीन गोष्टी आहेत. 2014 मध्ये ज्या आमदारांना दगा दिला त्यांना भाजपबरोबर जायचंय, 2019 मध्ये आपल्या मनासारखं झालं नाही. काही आमदारांचा दबाव आहे की भाजपबरोबर युती करा. त्यांना माझ्यासमोर आणा. माझे दोन तीन प्रश्न आहेत.

भुजबळांनी अटकेचा प्रयत्न केला असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला तेव्हा त्यांनी सगळ्या प्रकरणाचा खुलासा केला. त्यांची भेट झाली. तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की ठीक आहे आपलं वैर संपलं.

आज त्यांनी जे केलं तेच त्यांनी आधीच का केलं नाही. ठरल्याप्रमाणे केलं असतं तर आज अडीच वर्षं झाली होती. एक तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता किंवा त्यांचा मुख्यमंत्री झाला असता. बरं मी हेही सांगितलं होतं की तुम्ही पहिली अडीच वर्षं शिवसेनेला दिली तर ज्या तारखेला राजीनामा द्यायचा आहे त्या पत्रावर त्या मुख्यमंत्र्याची सही घेतली असती आणि त्याचं होर्डिंग करून मंत्रालयात लावलं असतं.

सध्या जे महाराष्ट्रात चाललंय ते महाराष्ट्राची हास्यजत्रा वाटत नाही का? ज्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं ते उपमुख्यमंत्री झाले

उपरवाले की कृपा

कोण उपरवाला ? त्यांचं त्यांना माहिती. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचे सगळ्यात मोठे नेते आहेत.

त्यांच्याबरोबर असं का वागलं गेलं हे कळलं नाही. तो त्यांचा पक्षाअंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या पक्षातले जे जुने जाणते निष्ठावान आजही माझ्या संपर्कात आहेत. ते निष्ठेने भाजपचं काम करताहेत. त्यांनाही काही ते पटत नाहीये तरी ते निष्ठेने काम करताहेत.

शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना त्यांना करायचा आहे. शिवसेनैकांविरुद्ध शिवसेना संपवायची होती त्यांना. तुम्ही ध्यानीमनी नसताना वर्षा सोडलं.

मी ध्यानीमनी नसताना तिथे गेलो, तसंच ध्यानीमनी नसताना तिथून आलो. जी गोष्ट आपली नाही ती मिळवण्यात कसलाही आनंद असता कामा नये आणि जे आपलं नव्हतीच ती सोडण्यात वाईट वाटण्याचं कारण नाही. जी माणसं आपली नाहीत ती सोडून गेल्याचं वाईट वाटता कामा नये.

जेव्हा तुम्ही म्हणाला होता की तुम्ही वर्षा सोडताय तेव्हा महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू होते. तुम्ही वर्षा सोडलं तेव्हा महिला, शिवसैनिक, तुम्हाला मानवंदना देत होते हे चित्र पाहून तुम्हाला काय वाटतं?

मी एका वेगळ्या पद्धतीने आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. अनेक मुख्यमंत्री येतात आणि जातात पण माझ्या जाण्याने लोक गलबलतात ही माझ्या आयुष्याची खूप मोठी कमाई आहे. कारण मी लोकांना मी आपला वाटलो. प्रेम पैशानी खरेदी करता येत नाही. तुम्ही बोलताना कुटुंबातला एक बोलतोय असं वाटणं हे खूप मोठं आहे

तुम्ही विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले असता तर फुटीर लोक अधिक उघडे पडले असते? ते उघडे पडलेच ना, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पडले, हल्ली लोकशाहीत डोकं वापरण्यापेक्षा मोजण्याचाच जास्त उपयोग होतोय आणि मला सातत्याने भासवलं जात होतं की काँग्रेस दगा देणार आणि पवार साहेबांची तर ओळखच ती आहे असं म्हणायचे. माझ्याच लोकांनी मला दगा दिला.

त्यांनी येऊन सांगितलं असतं तर मी केलं असतं. त्या विश्वासघातक्यांना मी म्हटलं होतं की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे ना मी राष्ट्रवादीशी बोलतोय, भाजपसोबत जायचं आहे का? मी सांगितलं असतं की झालं तितकं खूप झालं माझी लोक काही तुमच्याबरोबर आनंदाने रहायला तयार नाही कारण तेवढी हिम्मत नाही.

मुख्यमंत्रिपद माझी स्वीकारण्याचीच तयारी नव्हती. मी त्या काळात ते जिद्दीने केलं. मी जिद्दीवर मुख्यमंत्री झालो. माझं इतकंच म्हणणं आहे माझा राग तुम्ही मुंबईवर काढू नका. पर्यावरणाचा घात होईल असं काही करू नका. आजही तिथे वन्यजीव आहेत. तुम्ही ते कांजुरला केलं तर ते अधिक लोकसंख्येसाठी वापरता येईल. आज ना उद्या तिथे करावंच लागणार आहे. मुंबईचा घात करू नका, नाहीतर मला असं म्हणावं लागेल की हे मुंबईबाहेरचे असल्याने यांना मुंबईवर प्रेम नाही की काय.

शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होईल?- का नाही होणार? तो जर करायचा नसेल तर माझ्या लढाईला काय अर्थ आहे. माझं आजंही शिवसेनाप्रमुखांना वचन आहे. मी मुख्यमंत्री व्हावं हा माझा हेतू नव्हता. वचन पूर्ण करूनसुद्धा मी दुकान बंद करून बसेन?

पुन्हा शिवसेनेचे हे तुफान महाराष्ट्रात निर्माण होईल?- ते आहेच. लोकांच्या मनामध्ये तुफान आहे, लोकांच्या मनामध्ये तुफान आहे. जे फुटीर लोक आहेत त्यांनी एक विनंती केली आहे की त्यांना गद्दार म्हणू नका. म्हणून मी त्यांना विश्वासघातकी म्हणालो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.