एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे राष्ट्रीय उत्तराधिकारी- रामदेवबाबा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सोमवारी योगगुरू रामदेवबाबांनी (Ramdev Baba) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्यानंतर त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच रामदेवबाबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे.

एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे राष्ट्रीय उत्तराधिकारी

या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. तसेच, रामदेवबाबांनी मुख्यमंत्र्यांना बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) मानस आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारीदेखील म्हटल्यामुळे यावरून नव्याने राजकीय चर्चा सुर होण्याची शक्यता आहे.

वादात भर पडणार 

शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातला हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. त्यातच आता योगगुरू रामदेवबाबा यांनी एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरेंचे राष्ट्रीय उत्तराधिकारी म्हटल्यामुळे या वादात अधिकच भर पडण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले रामदेवबाबा?

योगगुरू रामदेवबाबांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना आम्ही मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो, असं सांगितलं आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदू धर्माचे, सनातन धर्माचे गौरव पुरूष आहेत. आपल्या राजधर्मासोबत ते आपल्या सनातन धर्म आणि ऋषीधर्माचं प्रामाणिकपणे पालन करत आहेत. त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो होतो”, असं रामदेवबाबा म्हणाले आहेत.

“बाळासाहेब ठाकरेंशी आमचे स्नेहसंबंध होते. एकनाथ शिंदे हे त्यांचे मानस आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत असं आम्हाला वाटतं. या राजधर्मासोबत सनातन धर्माच्या प्रतिष्ठेबाबत आम्ही संवाद केला. फार चांगलं वाटलं”, असं देखील रामदेवबाबांनी नमूद केलं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.