स्मिताताईंना एकनिष्ठतेचे फळ; जातीय समीकरणाचे रक्षाताईंना बळ

विरोधकांना घायाळ करण्याची भाजपाची व्यूहरचना

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाने दुसरी यादी जाहीर करुन विरोधकांवर मात केली असून जिल्ह्यातील जळगाव व रावेरसाठी महिला उमेदवारांची निवड केली असून महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे. विकसित भारत संकल्पनेत महिला सशक्तीकरणावर जोर दिला जात असून त्याचाच भाग म्हणून महिलांना संधी दिली गेली आहे. स्मिताताई वाघ या भाजपाच्या मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील विद्यार्थी परिषदेच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या एकनिष्ठतेला भाजपाने फळ दिले आहे. तर दुसरीकडे रावेर मतदारसंघात रक्षाताई खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देवून जातीय समीकरणाला बळ देण्याचे काम केले आहे.

एकनिष्ठतेच्या झाडाला उमेदवारीचे फळ

विद्यार्थी दशेत असतांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्ती म्हणून सुरु केलेले काम आज खासदारकीच्या उमेदवारीपर्यंत पोहचले आहे. स्मिताताई  वाघ या भाजपामधील सक्रिय कार्यकर्त्या असून कधीही त्यांनी पदाची अपेक्षा केली नाही. मिळेल ते आनंदाने स्विकारणे हेच मूल्य जपल्याने त्यांना पक्षाने विधानपरिषदेवर देखील पाठविले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, महिला मोर्चाच्या अध्यक्षा अशी एक ना अनेक पदे देवून त्यांना कायम सक्रिय ठेवले.

सन 2019 मध्ये त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली. त्यांनी प्रचाराचा शुभारंभ देखील केला; मात्र कुठेतरी माशी शिंकली आणि त्यांचे तिकीट कापले गेले. ऐनवेळी तिकीट कापले गेले म्हणून त्यांनी आदळ-आपट केली नाही. उलटपक्षी अधिक जोमाने पक्ष कार्यात झोकून दिले. यावर्षीही त्यांची लोकसभा लढण्याची इच्छा होती, मात्र त्यांना जाहीरपणे तशी इच्छा प्रकट केली नाही.

श्रेष्ठींनी त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा पत्ता कट करीत त्यांना उमेदवारी देत त्यांच्या एकनिष्ठतेवर उमेदवारीची मोहर उमटविली. त्यांचे पती स्व. उदय वाघ यांनी सलग दहा वर्षे जिल्हाध्यक्ष म्हणून मोठे काम केले होते. त्याचाही हिशोब त्यांच्या उमेदवारीसाठी पोषक ठरला. एकंदरीत भाजपाच्या तत्त्वानुसार एकनिष्ठतेला यश आले असून स्मिताताईंच्या रुपाने एक सक्रिय महिला उमेदवाराच्या रुपाने पुढे आल्या आहेत.

जातीय समीकरणामुळे रक्षाताईंना बळ

विद्यमान खासदार रक्षाताई  खडसे यांचा पत्ता कट होणार अशी काहीशी स्थिती मध्यंतरीच्या काळात निर्माण झाली होती. त्यांचे श्वसूर ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपाला रामराम केल्यामुळे यावर्षी त्यांना उमेदवारी मिळणार नाही असा कयास असतांना भाजपाने जातीय समीकरणावर लक्ष केंद्रीत करीत रक्षाताईंना पुन्हा संधी दिली आहे. एकनाथराव खडसे यांच्या पाठोपाठ त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी महिला मोर्चाचा राजीनामा देवून राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली; त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून रक्षाताईही तोच कित्ता गिरविणार अशी स्थिती होती मात्र रक्षाताईंनी  भाजपाची साथ सोडली नाही.

उलटपक्षी त्या भाजपात अधिक जोमाने सक्रिय झाल्यात. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचे काम केले. मध्यंतरी खडसे परिवाराच्या  मालमत्तेवर टाच येणार अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर रक्षाताईंनी थेट गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेवून त्यात ‘मार्ग’ काढला.

रक्षाताई या गुर्जर समाजाच्या असून लग्नानंतर त्या लेवा समाजात आल्या. रावेर लोकसभा मतदारसंघात या समाजाचे प्राबल्य असल्याने भाजपाने याच गणितावर बारकाईने गोळाबेरीज केली आणि रक्षाताई खडसे यांना तिसऱ्यांचा उमेदवारी दिली. भाजपाच्या धोरणानुसार यावर्षी तिसऱ्यांना बोटावर मोजण्या इतक्याच लोकांना उमेदवारी देण्यात आली असतांना त्यात रक्षाताई सरस ठरल्या आहेत.

एकंदरीत भाजपाने महिला सक्षमीकरणावर जास्त भर दिला असून लोकसभेत महिलांची वाढविण्यावर भर दिला जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.