अपक्षांची ‘तुतारी’ राष्ट्रवादीसाठी अडचणीची !

0

नाशिक ;- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गट ‘तुतारी फुंकणारा मनुष्य’ या चिन्हावर लोकसभा निवडणुकीत लढवत असताना ‘तुतारी’ हे नामसाधर्म्य असलेले चिन्ह अपक्षांना मिळणार असल्याने त्यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. शरद पवार गटाने याबाबत आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने हा आक्षेप फेटाळून लावल्याने अपक्षांची ‘तुतारी’ राष्ट्रवादीला अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाचे घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाकडे गेले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला तुतारी फुंकणारा मनुष्य हे निवडणूक चिन्ह मिळाले असून, त्यावर लोकसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. नाशिक जिल्ह्यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचा उमेदवार असल्यामुळे त्यांना या चिन्हाचा वापर करावा लागणार आहे. परंतु, निवडणूक आयोगाने अकरा प्रमुख राजकीय पक्षांसाठी चिन्ह निश्चित करून दिले आहे. सोबतच अपक्ष उमेदवारांसाठी 190 वेगवेगळे चिन्ह जिल्हा निवडणूक विभागाला दिले आहे.
अपक्ष उमेदवारांनी मागणी केल्यानंतर त्यातून एक चिन्ह देण्यात येते. निवडणूक आयोगाच्या यादीत 174 क्रमांकावर तुतारी हे चिन्ह आहे. त्याचे मराठी भाषांतर हे तुतारी करण्यात आले आहे. प्रत्यक्षात दोन्ही चिन्हांमध्ये कुठेही साधर्म्य दिसून येत नाही. पण ‘तुतारी’ या एका शब्दावरच राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातही यासंदर्भात वाद निर्माण होऊ शकतो. त्यादृष्टीने जिल्हा निवडणूक विभाग सतर्क झाला असून, मराठीसह ‘हिंदी’तील शब्दही कसा वापरता येईल, यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.