भाजपकडून उमेदवार बदलण्याच्या हालचाली गतिमान ?

रावेरसाठी वरिष्ठांवर दबाबतंत्र : शिंदेसेनेनेही व्यक्त केली नाराजी

0

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क

भाजपकडून रावेर लोकसभा मतदारसंघासाठी सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेल्या रक्षा खडसे यांची उमेदवारी बदलली जाण्याची शक्यता बळावत आहे. एकनाथराव खडसे यांनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली आहे. एकीकडे नाथाभाऊंच्या माघारीचा निर्णय होत असताना दुसरीकडे रक्षा खडसे यांना बदलण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांकडूनच दबाव टाकला जात असल्याची माहिती समोर आल्याने भाजपात हालचाली गतिमान झाल्या आहेत. परवाच्या जिल्हा बैठकीत नाराज असलेले जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी गद्दारी होणार नसल्याचे सांगितले असले तरी दवाबतंत्राचा वापर मात्र होत आहे.

विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपच्या जिल्ह्यातील अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा देण्याचा पवित्र घेतला होता. हे राजीनामे मंत्री गिरीश महाजन यांनी फटाळले असले तरी नाराज पदाधिकारी मात्र श्रेष्ठींवर दबाव वाढवित आहेत. मुळात भाजपमध्ये राजीनामा सत्राची संस्कृती नसतांनाही त्या संस्कृतीचे जाहीर प्रदर्शन झाल्याने श्रेष्ठींनीही डोक्याला हात लावला आहे.

सध्या रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवार बदलाच्या हालचाली गतिमान होत असल्याची चर्चा होत आहे. त्यातच एकनाथराव खडसे यांचे राजकीय विरोधक असलेले शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील आता रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवरुन नाराजी व्यक्त केल्याने भाजपानेही सावध होत पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे.

वेळेची उसंती… उमेदवारी बदलासाठी पसंती?

रावेर लोकसभेच्या निवडणुकीसाठी अद्याप दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने भाजप श्रेष्ठींनीही विचार करण्यास सुरुवात केली आहे. पक्षातंर्गत वाद वाढत गेलेच तर उमेदवारी बदलविण्याचा विचार होण्याची शक्यता अधिक आहे. वेळेची उसंती आणि उमेदवार बदलासाठी पसंती दिला जावू शकते.

महाजनांच्या मनात आहे तरी काय?

भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना आपले निकटवर्तीय माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे यांना उमेदवारी द्यायची होती. परंतु, दिल्लीतून रक्षा खडसे यांचे नाव जाहीर झाल्याने गिरीश महाजनही नाराज झाल्याची चर्चा आहे. रावेर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने महाजनांचा मार्ग सोपा होत असल्याचीही चर्चा आहे. परंतु गिरीश महाजन यांच्या मनात काय चालू आहे हे सांगणे कठीण असले तरी त्यांची देहबोली बैठकीत काही वेगळेच सांगून गेली.

Leave A Reply

Your email address will not be published.