अवैध वाळू वाहतुकीच्या हिमतीचा कळसच..!

0

लोकशाही संपादकीय लेख

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या हिमतीला दादच दिली पाहिजे. जळगाव तालुक्यातील सावखेडा येथे गिरणा नदीतून विनापरवाना वाळूने भरलेला ट्रॅक्टर तालुका पोलिसांनी पकडून जप्त केला. जिल्हाधिकारी ‘अमन मित्तल’ (Aman Mittal) हे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे कर्दनकाळ असताना विनापरवाना ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक केली जाते, म्हणजे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांच्या हिमतीला दात दिली पाहिजे. वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांनी जळगाव जिल्ह्याची लाईफ लाईन असलेल्या गिरणा नदीला अक्षरशा बोडके केले आहे. वाहतूकदारांची दखल घेऊन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी स्वतः गिरणा नदीत उतरून अवैध वाळूचा उपसा करणाऱ्यांवर चांगलीच जरब बसवली असताना अवैध वाळूचा उपसा केला जातोय याचा अर्थ वाळूमाफी किती मुजोर झाले आहेत, त्यांचा हा इरसाल नमुना म्हणावा लागेल. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांच्या विरोधात कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी असताना या वाळूमाफियांना का रोखले जात नाही? हा चर्चेचा विषय बनला आहे.

गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांच्या बाबतीत राजकीय नेत्यांचा तसेच सत्ताधारी राजकीय पक्षाच्या नेत्यांचा वरदहस्त असल्याची टीका केली जाते आणि या तथ्यांशी असल्याचे मानले जात आहे. २०२२ च्या जानेवारीमध्ये एक वर्षांपूर्वी गिरणा बचाव परिक्रमा मोहीम जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) यांच्या नेतृत्वात काढण्यात आली जळगाव तालुक्यातील कानळदा येथून गिरणा बचाव परिक्रमाची शुभारंभ झाला. गिरणा बचाव परिक्रमा ही मोहीम भाजपची नसून ती सर्वपक्षीय असल्याचे खासदार उन्मेष पाटील यांनी म्हटले असले, तरी त्यात भाजपच्याच नेते आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता. जानेवारी २०२२ मध्ये महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये आताचे पालकमंत्री, पाणीपुरवठा मंत्री शिवसेनेचे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हेच पालकमंत्री होते. त्यावेळी गिरणा बचाव परिक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमात तसेच गिरणा परिक्रमा मोहिमेत खासदार उन्मेष पाटील यांनी तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव पाटलांवर अवैध वाळू वाहतुकीचा आशीर्वाद असल्याचा निशाणा साधला होता. त्यावेळी गुलाबराव पाटील आणि खासदार उन्मेष पाटील यांच्यातील आरोप प्रत्यारोपाचा कलगीतुरा चांगलाच रंगला होता. गुलाबराव पाटील हे आपल्या पाळधी गावातून जळगावला ये जा करत असतात गिरणा नदीतील अवैध वाळू करणाऱ्यांकडे पाहून न पाहिल्यासारखे करण्यामागचे कारण काय? असा प्रश्न खासदार उन्मेष पाटील यांनी उपस्थित करून, गुलाबरावांच्या वरदहस्तांमुळेच अवैध वाळू वाहतूक होत आहे, असा निशाणा साधला होता. तेव्हा गुलाबराव पाटलांनी खासदार उन्मेष पाटलांवर पलटवार करून त्यांची खिल्ली उडवली होती. 2014 ते 2019 या कालावधीत भाजप शिवसेनेचे सरकार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असताना या वाळू माफियांवर कुणाचा वरदहस्त होता? असा आरोप विरोधकांनी केला.

एकंदरीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून राजकारण करण्यासाठी वाळू माफियांना संरक्षण देण्यात येते, हे सत्य नाकारता येत नाही. जोपर्यंत राजकीय नेते निपक्षपणे अवैध वाळू उपचार या बाबतीत भूमिका घेत नाही, तोपर्यंत गिरणा वाळू उपसा होतच राहील. आणि या जिल्ह्याची लाईफ लाईन असलेल्या गिरणा नदीतील वारेमाप वाळू वाहतुकीमुळे जळगाव जिल्ह्यावर भविष्यात पाण्याचा तुटवडा होण्याचे संकट निर्माण होईल. यासाठीचे भविष्य सांगण्यासाठी कुण्या भविष्यवेत्याचे गरज नाही. गिरणा बचाव परिक्रमा मोहीम सुमारे २५० किलोमीटर इतकी केल्यानंतर त्याचा काय फायदा झाला? याचा खासदार उन्मेष पाटलांनी अहवाल सादर करायला हवा. तो अद्याप झालेला नाही. गिरणा नदीपात्राकाठच्या गावात जाऊन गिरणा नदीला वाचवण्या संदर्भात खासदार उन्मेष पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रबोधनातून काय साध्य झाले? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, तर काहीही साध्य झाले नाही. केवळ भाजपचा (BJP) प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न झाला, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येते. विरोधकांच्या या टीकेत अत्यांश आहे. कारण गिरणा काठच्या गावी वसलेल्या गावात जणू गिरणा नदी बचावच्या प्रबोधनाऐवजी आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते. त्यामुळे गिरणा बचाव परिक्रमेचा हेतू शुद्ध असल्याचे भासवण्यात आले असले, तर त्यावर भाजपचाच कब्जा होता, हे स्पष्ट दिसून आले. केवळ आपल्या मतदारसंघात खासदार एक लोकप्रतिनिधी म्हणून काही तरी करतोय एवढेच त्यातून साध्य झाले. कारण वर्ष उलटले तरी गिरणा बचाव परिक्रमा मोहिमेचे फलित काय आणि त्यातून काय साध्य झाले, याबाबत खासदार उन्मेष पाटील काहीही बोलायला तयार नाही.

सहा महिन्यांपूर्वी शिंदे फडणवीस यांचे सरकार महाराष्ट्रात आल्याने गुलाबराव पाटलांवर टीका करणारे खासदार उन्मेष पाटील आता मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे गिरणा बचाव परिक्रमेला राजकीय विशेषतः भाजप पक्षाचे प्रचार प्रसार करण्याचे माध्यम केल्याचे बोलले जात आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.