जरांगेंच्या अटकेचा दावा, गुलाबराव म्हणाले, “राऊतांना बोंबलायचं..”

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात मराठा आंदोलन तीव्र होतेय. बीडमधील हिंसाचारप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना अटक होऊ शकते अशी अटकळ बांधली जात आहे. तर येत्या दिवसांत काहीही होऊ शकतं, असं संजय राऊत म्हणाले आहेत. या आरोपांवर शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

ते सुशिक्षित बेरोजगार 

गुलाबराव पाटील म्हणाले की, “मनोज जरांगे पाटील सगळीकडे सभा घेत आहेत. ओबीसीच्या नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्रे देणार असं सरकारने जाहीर केलं आहे. त्यामुळे त्यांच्या मनात अटकेची भीती येऊ नये”, असं आश्वासन गुलाबराव पाटलांनी दिलं. राऊतांच्या विधानावर त्यांनी प्रत्युत्तर दिलं की, राऊतांना कामं नाहीयत. ते सुशिक्षित बेरोजगार आहेत. त्यांचं कामच आहे बोंबलायचं.

मनोज जरांगेंचा इशारा 

“मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेतो, असं सरकारने म्हटले होते. पण त्यांनी गुन्हे मागे घेतले नाहीत. त्यामुळे माझ्या अटकेची शक्यताही असू शकते. पण मला अटक करणं सरकारला तेवढं सोपं जाणार नाही. मला अटक करायची असेल तर करू द्या. मी तुरुंगात जायला घाबरत नाही. मला अटक झाल्यावर मराठा समाज काय आहे? हे सरकारला कळेल,” अशा शब्दांत मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे.

पोलिसांची जात उफाळून.. 

मनोज जरांगे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना आम्ही विनंती केली आहे, की आंदोलकांची अटक थांबवा. बीडमध्ये जे घडलं ते सत्य आहे. त्याचं आम्ही कधीही समर्थन केलं नाही. पण तुम्ही निष्पाप लोकांना तुरुंगात टाकलं आहे. तीन-चार हजार लोकांच्या याद्या केल्या आहेत. काही पोलिसांची जात उफाळून आली आहे. पोलिसांना कोणतीही जात नसते आणि नसायलाही पाहिजे. तरच राज्य शांत चालू शकतं. लोकांनी पोलिसांवर रोष व्यक्त केला नाही पाहिजे. पोलीस हा आपला मित्र आहे. पोलीस आपल्याला आधार देणारा आहे. जातीय द्वेष करणार नाही, अशी भावना पाहिजे.”

 

Leave A Reply

Your email address will not be published.