महाविकास आघाडीमुळे विकास खुंटला; गिरीश महाजनांची टीका

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर  गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे आज सकाळी जळगाव (Jalgaon) येथे रेल्वेने आगमन झाले. यावेळी महाजन यांचे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालादेखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार

यानंतर पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता १७ ऑगस्टपासून विधिमंडळाचे अधिवेशन राहणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीच मंत्र्यांचे खाते वाटप होईल.  यासोबतच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत व सिंचनासह रस्ते, वीज, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावल्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आता विकासाचा वेग दुपटीने

यावेळी गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aaghadi) जोरदार टीका केली. ते म्हणाले की, अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचा विकास खुंटला आहे. आता मंत्रीपद मिळाल्याने मोठी जबाबदारी वाढली आहे. युती सरकारमध्ये आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे दमदार नेतृत्व असून सोबतच केंद्रातील भाजप सरकारमुळे डबल इंजिन राहणार असल्याने विकासाचा वेग दुपटीने होईल, असा विश्वास व्यक्त करीत राज्यातील रखडलेली कामे वेगाने करण्यावर भर राहणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरदेखील टीका करीत त्यांनी कार्यकर्ते तर दूरच मंत्री, आमदारांच्यादेखील त्यांनी भेटी घेतल्या नाही व केवळ ऑनलाइन कामकाज चालविले. त्यामुळे राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहे.

ध्वजारोहण कोणाच्या हस्ते ?

स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण नेमके कोणाच्या हस्ते होईल या प्रश्नावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, जळगाव येथे गुलाबराव पाटील यांच्याहस्ते तर माझ्या हस्ते नाशिक येथे ध्वजारोहण होईल, असे सांगितले. ध्वजारोहण तसे पालकमंत्र्यांचे हस्ते होत असते त्यामुळे गिरीश महाजन यांनी दिलेल्या या माहितीमुळे पालकमंत्री पद जवळपास निश्चित झाले असल्याचे मानले जात आहे.

पंकजा मुंडेंना मोठे पद ?

तसेच महाजन म्हणाले की, अजून २३ मंत्री शपथ घेणे बाकी आहे. त्यात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची नाराजी असण्याचा प्रश्नच येत नाही. कदाचित त्यांना मोठेपद मिळू शकते, असे महाजन म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराला दिरंगाई झाली हे मान्य आहे असे सांगत त्यांनी थोडीफार नाराजी असतेच मात्र ती दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असे स्पष्ट केले

चित्रा वाघ यांचे वैयक्तिक मत 

संजय राठोड (Sanjay Rathod) यांना पुन्हा मंत्रीपद देण्याबाबत चोहीकडून सरकारवर टीका केली जातेय. यावर महाजन म्हणाले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारने राठोड यांना क्लीन चिट दिली असून त्यांनीच क्लीनपीठ द्यायची व आता मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांच्यावर टीका करायची, हे योग्य नसल्याचे म्हणाले. तसेच भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी देखील राठोड यांच्या बद्दल केलेल्या टीके विषयी ते त्यांचे वैयक्तिक मत आहे, असे महाजन म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.