पंकजा मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे- एकनाथराव खडसे

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर राज्यातील राजकारणाला वेगळेच वळण लागलं आहे. तसेच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. या घटनांवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी भाष्य केलं आहे.

.. तर हे सरकार कोसळू शकतं

खडसे म्हणाले की, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांनी विश्वास मताला सामोरे जाऊन अधिवेशनात संख्याबळाची चाचणी केली असती तर अधिक उचित ठरले असते. तसेच धनुष्यबाण चिन्ह हे शिवसेनेलाच मिळाले पाहिजे.  सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठात उद्धव ठाकरेंनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देण्यात आला, मात्र आमदारांच्या अपात्रतेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. चिन्हाबाबत निवडणूक आयोगाची भूमिका काय हे आयोगाच्या निर्णयानंतर स्पष्ट होईल. शिवसेना हा जुना पक्ष असून धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेला मिळावा ही अपेक्षा आहे. 16 आमदार अपात्र झाले तर हे सरकार कोसळू शकतं. असंही खडसे म्हणाले.

पंकजा मुंडेंचं विधान चर्चेत 

दरम्यान भाजपच्या महिला नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकतंच केलेलं एक विधान चर्चेत आलं आहे. आपल्या भाषणात त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या नावाचा उल्लेख केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. घराणेशाहीवर बोलताना जनमानसात माझी प्रतिमा चांगली असेल तर मोदीही माझं राजकारण संपवू शकणार नाहीत, असं पंकजा म्हणून गेल्या.

माझा कुणीही पराभव करू शकत नाही

पंकज मुंडेंच्या या विधानावर एकनाथराव खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसे म्हणाले की, राज्यसभेत पंकजा मुंडे यांना स्थान मिळालं नाही मात्र विधानसभेमध्ये सुद्धा पंकजा मुंडे यांना हरविण्यात आलं. ही खंत पंकजा मुंडे यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे जनतेच्या विकास कामासाठी जोपर्यंत माझे योगदान राहील तोपर्यंत माझा कुणीही पराभव करू शकत नाही अशी भावना पंकजा मुंडे यांच्या मनात होती. व त्यातून त्यांनी हे वक्तव्य केलं असावं’ असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं.

पंकजा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे

‘मात्र मोदीजी सुद्धा माझा पराभव करू शकत नाही असं जर टीकेने म्हटलं असेल तर ते दुर्दैवी असून नरेंद्र मोदी यांचा अपमान करण्याची भावना पंकजा मुंडे यांची नव्हती असंही एकनाथ खडसे म्हणाले. पंकजा मुंडे पक्षावर नाराज असणं हे स्वाभाविक आहे. पंकजा मुंडे यांना न्याय मिळायला पाहिजे. गेल्या अनेक वर्षापासून पंकजा मुंडे यांच्यावर सातत्याने अन्याय होत असून मधल्या काळात पंकजा मुंडे यांना बदनाम करण्याचा देखील प्रयत्न झाला. मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपाचे राज्य आणून देण्यामध्ये ज्यांचे योगदान राहिलं त्यांची जर उपेक्षा पक्षाच्या माध्यमातून होत असेल तर हे योग्य नसून पंकजा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे, असंही खडसे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.