मंत्रीपदाचे बाशिंग गुडघ्याला बांधून आमदार सज्ज..!

0

गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार या चर्चेला ऊत आला होता. काल सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रते संदर्भात १२ जुलैपर्यंत निर्णय लांबणीवर पडल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या गटातील सर्व बंडखोर आमदारांनी गुवाहाटी येथील रेसिडेंस हॉटेलमध्ये जल्लोश केला. आता एकनाथ शिंदे मुंबईला येऊन राज्यपालांना भेटणार, आणि महाविकास आघाडी सरकारने विश्वास गमावला असल्याचे पत्र देणार, अशा बातम्या व्हायरल होत आहेत. परंतु हे पत्र केव्हा देणार? याची निश्चित तारीख देण्यास एकनाथ शिंदे यांनी मात्र नकार दिला.

‘लवकरच तुम्हाला कळवू’, असे माध्यमांना सांगून वेळ मारून नेली. तथापि विरोधी पक्षनेते, भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली भेटीने भाजप आणि बंडखोर  शिवसेना आमदारांचे सरकार स्थापन होण्याच्या वावड्यांना मात्र ऊत आला आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार, हे ठरवण्याच्या बातम्या या पूर्वीपासूनच व्हायरल होत आहेत. बंडखोर शिंदे गटाला आठ कॅबिनेट मंत्री आणि पाच राज्यमंत्री देण्याचा फॉर्म्युला ठरला असल्याचे वृत्त पसरले आहे. एकूण 40 शिवसेना बंडखोर आमदारांपैकी कॅबिनेट व राज्यमंत्री मिळून 13 आमदारांना संधी मिळणार आहे. बाकीचे 27 आमदार मंत्र्यांविना आमदारच राहतील.

आता तेरा मंत्र्यांपैकी जळगाव जिल्ह्यातील तीन आमदारांना मंत्रिमंडळात समावेश मिळणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर जिल्ह्यात व्हायरल होत आहेत. त्यात पहिले नाव पाचोऱ्याचे आमदार किशोर आप्पा पाटील, दुसरे पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील आणि तिसरे मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तेरा आमदारांपैकी जळगाव जिल्ह्यातील तीन आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश झाला, तर संपूर्ण महाराष्ट्रातून इतर दहा आमदारांना मंत्री पद मिळेल, असे यावरून दिसते. हे शक्य आहे का ? अशक्य नसेल तर या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्याला आधार काय ? असा प्रश्न उपस्थित होतो.

वरील तिघांच्या मंत्रिमंडळात समावेश झाला तर विद्यमान जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मंत्री पदापासून वंचित राहतील काय ? हा सुद्धा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्यातील सर्वात जुने कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांचे शिक्षण कमी असले तरी खानदेशची मुलुख मैदान तोफ म्हणून त्यांची खास ओळख आहे. त्यांच्या वक्तृत्वाला तोड नाही. जमिनीवरचा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. मंत्रिमंडळातील आमदारांच्या सुख-दुःखात धाऊन जाणारा नेता म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे. पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील आणि त्यांचे राजकीय मतभेद आहेत, आणि बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील होणारे ते पहिले आमदार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले तर चिमणराव पाटील यांच्या नावाला मंत्री म्हणून पहिली पसंती राहील, अशी जिल्हा सुद्धा चर्चा सुरू आहे.

चिमणराव पाटलांनंतर दुसरे नाव आहे ते पाचोरा चे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे. त्याचे एकमेव कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांचे पाचोरा कनेक्शन हे होय. महा विकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात स्थापन झाल्यापासून आमदार किशोर आप्पा पाटील हे एकनाथ शिंदे यांचे समर्थक राहिलेले आहे. त्यामुळे किशोर आप्पा पाटील यांच्या नावाला एकनाथ शिंदे यांचा मंत्रिमंडळात घेण्यासाठी पसंती राहू शकते. त्यानंतर तिसरे नाव मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे असून त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, असे वृत्त आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडात जवळ जवळ 12 अपक्ष आमदार असल्याचे सांगण्यात येते.

तेव्हा मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात घेतल्यानंतर इतर अपक्ष आमदार गप्प बसतील का ? याचाही विचार होऊ शकतो. तथापि माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना शह देण्यासाठी चंद्रकांत पाटलांच्या नावाचे पिल्लू गेले आहे, हे स्पष्ट दिसून येते. कारण एकनाथ शिंदेंना यांच्या त्यांच्या गटातील तोलामोलाचे आमदारांची कारकीर्द, त्यांच्या अभ्यास आणि शिंदे गटाला त्यांचा होणारा उपयोग तथा विभागाचा समतोल साधण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

आज जळगाव जिल्ह्यातील बंडखोर शिवसेना आमदारांचा शिंदे मंत्रिमंडळात समावेश होणार म्हणून ज्या बातम्या प्रसूत होत आहेत, या अधिकृत आहेत असे समजण्याचे कारण नाही. अशा प्रकारच्या बातम्या माध्यमात पसरवून आमदार मतदार संघातील आमदारांना गाजर दाखवून खूश करण्याचा प्रयत्न आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गेल्या आठ-दहा दिवसांपासून या सर्व आमदारांचा मतदार संघाशी संपर्क नाही. पाऊस लांबल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव आकाशाला भिडले आहेत.

रावेर तालुक्यातील झालेल्या वादळामुळे केळी उत्पादनाचे मोठे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांचे अक्षरशा कंबरडे मोडले गेले. त्यांना योग्य ती कारवाई मिळाली पाहिजे. त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना दिलासा देण्याऐवजी आपल्या मतदारसंघात पासून ते दोन अडीच हजार किलोमीटरवर असलेल्या आसामची राजधानी गुवाहाटी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये आपले मोबाईल फोन एकनाथ शिंदेंकडे सुपूर्त करून मौज मजा लुटत लुटत आहेत. मतदारसंघातील त्यांच्या विरोधात संघर्ष होत आहे. ते दिसताच काही समर्थकांकडून त्यांचे समर्थन करण्यासाठी रॅली काढली, म्हणजे मतदारसंघातील मतदारांकडून लोकप्रतिनिधी म्हणून काही नैतिक जबाबदारी आहे की नाही..! हा खरा प्रश्न आहे. मंत्रिपदाचे बाशिंग गुडघ्याला बांधून हे आमदार तयार असले तरी ते मृगजळच म्हणावे लागणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here