महायुती कार्यकर्त्यांच्या शक्ती प्रदर्शनाने शहर दणाणले..!

0

 

लोकशाही संपादकीय लेख;

 

परवा महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करताना जे शक्ती प्रदर्शन झाले, त्यापेक्षा जास्तीचे शक्ती प्रदर्शन काल महायुतीच्या वतीने करण्यात आले. दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत भर उन्हात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जळगाव शहर दणाणून टाकले. त्यात मुख्य आकर्षण होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे. देवेंद्र फडणवीस यांना जळगावला पोहोचायला सुमारे तीन तास उशीर झाला. त्याआधी जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ आणि रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील तसेच आमदार राजू मामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण यांच्या भाषणानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण होईपर्यंत महायुती रॅलीतील कार्यकर्ते उत्साहात जागेवर बसून होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर विशेषतः शिवसेनेच्या शिवराळ वक्तव्याचा समाचार घेतला. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही भगिनी उमेदवारांना मत देणे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करणे होय. देशाच्या लोकसभेच्या उमेदवाराला मतदान म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत होय, असे सांगून विरोधकांजवळ प्रचारात विकासाचे मुद्देच नसल्याने शिवराळ भाषेचा प्रयोग करत आहेत. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा लक्षात घेऊन ४०० कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने राखून ठेवले आहेत. अचार संहिता संपताच शेतकऱ्यांना मदत दिली जाणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील अनेक सिंचनाचे प्रश्न गिरीश महाजनांच्या नेतृत्वात सोडविण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यासाठी सुजलाम सुफलाम ठरणाऱ्या निम्न तापी प्रकल्प अर्थात अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणाच्या पूर्णत्वासाठी महाराष्ट्र शासनाने ४ हजार ८०० कोटींच्या प्रस्तावाला मान्यता देऊन ते केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले असून आचारसंहिता संपताच निम्न तापी प्रकल्पाचे काम जोमाने सुरू होईल. तसेच ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे सांगून फडणवीस यांनी जिल्हावासियांची मने जिंकली.

 

काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आता खऱ्या अर्थाने प्रचारात रंगत भरली आहे. कार्यकर्त्यांच्या शक्ती प्रदर्शनात महायुतीचे तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. आज २६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज अर्जांची छाननी झाल्यानंतर २९ एप्रिलला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट होणार असले, तरी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या उमेदवारांचा खरा सामना होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या रावेर लोकसभा मतदारसंघात दौरा होऊन जाहीर सभा व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन होत आहे. राष्ट्रवादी तर्फे स्टार प्रचारक तसेच शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभांचे नियोजन करण्यात येत आहे. महायुतीच्या वतीने स्टार प्रचारकांच्या जाहीर सभांचे नियोजनाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे नियोजन सुद्धा करण्यात येत आहे. त्यामुळे आता पाचव्या टप्प्यातील १३ मेला मतदान होण्यापर्यंत वाढत्या उन्हाबरोबरच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर सुद्धा वाढणार आहे. पहिला टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात घसरलेली टक्केवारी पाहता महाविकास आघाडीच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढविण्यावर सुद्धा भर दिला जाणार आहे. कमी मतदानाची टक्केवारी कोणाच्या फायद्याची अथवा तोट्याची याचा विचार करणे महत्त्वाचे नसून, सुदृढ लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. त्यासाठी मतदारांमध्ये जागृती निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. वाढत्या उन्हाचा फटका मतदानावर होण्याची शक्यता लक्षात घेऊन मतदारांनी मतदानासाठी सकाळीच घराबाहेर पडणे महत्त्वाचे आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. २०१४ आणि २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत जी मोदी लाट होती, तशा प्रकारची लाट २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दिसून येत नाही. त्यामुळे २०२४ ची निवडणूक विशेष चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.