निम्न तापी प्रकल्प आचारसंहितेनंतर पूर्ण होणार! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

जिल्ह्यासाठी वरदान असलेला निम्न तापी प्रकल्पाला आचारसंहितेनंतर पूर्णत्वास आणला जार्इल, शेतीला सिंचनाची जोड देवून जिल्हा सुजलाम्‌ सुफलाम्‌ केला जार्इल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हावासियांना दिली. आज महायुतीतर्फे रक्षा खडसे व स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महारॅलीत देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेवून उपस्थितांना अभिवादन केले. यावेळी व्यासपीठावर मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील, आमदार मंगेश चव्हाण, राजूमामा भोळे, संजय सावकारे यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नसल्याने ते खालच्या पातळीवरील टीका करीत आहेत. आया-बहिणींबद्दल वार्इट बोलणाऱ्यांना धडा शिकविण्याची हीच खरी संधी असून या संधीचे सोने करावे असे आवाहन करीत जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना आचारसंहितेनंतर चालणा देण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. देशाच्या नवनिर्मितीसाठी ही निवडणूक असून या निवडणुकीमध्ये देशामध्ये एकच पर्याय विकासपुरुष नरेंद्र मोदी आहेत. दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्षांची खिचडी खिचडी आहे. आपल्या महायुतीचे इंजिन मोदीजी आहेत. तर विरोधकांकडे सारेच इंजिनच्या रुपाने वापरत असून प्रत्येकला पंतप्रधान होण्याची घार्इ झाली आहे. महायुतीच्या गाडीत बसण्यासाठी सर्वांना जागा असून सबका साथ सबका विकास म्हणत आपली विकासाची गाडी पुढे जाते, तिकडे काय अवस्था आहे राहुल गांधी म्हणतो मी इंजिन,  शरद पवार म्हणतात मी असा सारा खेळ त्यांच्याकडे सुरु असून त्यांच्याकडे ना झेंडा आहे ना अजेंडा आहे. जळगाव जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला असून येथील प्रत्येक मत हे मोदीजींसाठी उपयुक्त असून प्रत्येकाने रक्षाताई आणि स्मिता र्तांच्या नावासमोरची कमळाचे बटन दाबावे असे आवाहनही त्यांनी केले. जगामध्ये कुठल्याही देशात गरीबांना बाहेर काढण्याचा अजेंडा नाही, आपल्या देशात मात्र 25 कोटी लोक गरीबी रेषेच्या बाहेर आजपर्यंत आले आहे. मोदीजींनी गेल्या दहा वर्षांमध्ये 20 कोटी लोक जे कच्च्या घरात राहायचे त्यांना पक्क घरे दिले आहेत असेही ते म्हणाले.

कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळणार आधार

शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असतांना त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न केले जात आहे. आचारसंहितेनंतर कापूस व सोयाबीन उत्पादकांना नुकसान भरपार्इचा मोबदला दिला जार्इल असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. निम्न तापीची योजना देखील आम्ही या ठिकाणी पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले. आपल्या सरकारमध्ये मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली 26 हजार कोटी रुपये सिंचनासाठी प्राप्त झाले असून  शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्याचे काम केले जाणार आहे.

अर्थव्यवस्था झाली मजबूत

पूर्वी देशाकडे दिवाळखोरी देश म्हणून पाहिले जात होते. मात्र मोदीजींनी गेल्या दहा वर्षांत देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली असून सबका साथ सबका विकास साध्य केला आहे. तळागळातील माणसापर्यंत विकासाची गंगा पोहचविण्यासाठी मोदींनी प्रयत्न केले असल्याचे फडणवीस म्हणाले.

विरोधकांची बत्तीगुल होणार

देशाचा विकास करण्याचा अजेंडा विरोधकांकडे नसल्याने ते खालच्या पातळीचे राजकारण करण्यात मग्न झालेले आहेत. घराणेशाही हाच त्यांचा अजेंडा असल्याने  आगामी निवडणुकीत त्यांची बत्तीगुल होणार असून त्यांना पळताभुर्इ थोडी होर्इल असेही फडणवीस यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.