भीषण अपघातात ४ जण जागीच ठार; १३ जण गंभीर जखमी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बाजारात विक्रीसाठी शेळ्या घेऊन निघालेल्या पीक-अप वाहनाला  ट्रक ड्रायव्हरने धडक दिल्याने आज पहाटे नशिराबादच्या पुढील उड्डाण पुलाजवळ भीषण अपघात घडला आहे. यामुळे महामार्गावरील सुरक्षेसह उड्डाणपुलाचे एका बाजूचे काम रखडल्याचा मुद्दादेखील ऐरणीवर आला आहे.

या संदर्भात वृत्त असे की, जळगाव आणि नशिराबाद येथून बकर्‍या भरून एक एमएच ४३ एडी : १०५१ क्रमांकाचे बोलेरो पीकअप वाहन फैजपूर येथे बाजार असल्याने निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याच्या पुढे असणार्‍या उड्डाणपुलाजवळ समोरून (भुसावळकडून ) भरधाव वेगाने येणार्‍या एमएच ०९ एचजी : ९५२१ क्रमांकाच्या ट्रकने रॉंग साईडला येऊन या वाहनाला जोरदार धडक दिली. यानंतर हीच ट्रक अजून एका वाहनाला धडकली. या भीषण तिहेरी अपघातात चार जण ठार झाले असून सहा जण जखमी झाले आहेत. मयतांमध्ये जुनेद सलीम खाटीक (वय-१८ रा. आझाद चौक,भडगाव); अकील गुलाब खाटीक (वय-४२ रा.फैजपूर हल्ली मुक्काम सुप्रीम कॉलनी जळगाव); नईम अब्दुल रहीम खाटीक (वय-५५रा. बिलाल चौक जळगाव) आणि फारुख मजिद खाटीक ( वय ४० रा. भडगाव आझाद चौक) यांचा समावेश आहे. ट्रक ड्रायव्हरच्या बेदरकारपणामुळे या चौघांना प्राण गमवावे लागले आहेत.

जखमींवर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला. तर अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. क्रेनच्या सहाय्याने तिन्ही वाहनांना महामार्गावरून बाजूला हटविण्यात आल्यानंतर वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत झाली.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. नशिराबाद येथील उड्डाणपुलाची फक्त एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली असून दुसर्‍या पुलाचे काम अजून सुरू आहे. यामुळे येथे कायम लहान-मोठे अपघात होत असतात. यातच आता येथे भीषण अपघात झाल्यामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.