पटना, लोकशाही न्यूज नेटवर्क;
दारुबंदी असलेल्या बिहारमधून एक विचित्र आणि शिक्षकी पेशाला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे सरकारी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी चक्क शाळेच्या आवाराला एखाद्या बियर बार असल्यासारखे दारू व चिकन ची पार्टी केली. त्यामुळे दारूबंदी कायद्यावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. बिहारमधील सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दारू न पिण्याची जाहीर शपथ घेतली आहे, तरीही ही परिस्थिती आहे.
हे संपूर्ण प्रकरण बांका जिल्ह्यातील राजौन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिलकावार येथील शासकीय प्राथमिक माध्यमिक विद्यालयाशी संबंधित आहे. येथे शिक्षणाचे पवित्र मंदिर मानल्या जाणाऱ्या ठिकाणाचे रुपांतर दारूच्या गुत्त्यात करण्यात आले. सोमवारी शाळेच्या आवारात मुख्याध्यापक व शिक्षक इतर तीन जणांसोबत बसून दारू पीत असल्याचे सांगण्यात येत आहे. सोबत चखणा म्हणून चिकनचीही व्यवस्था होती. मात्र याविषयी कोणीतरी याची माहिती उत्पादन विभागाच्या टीमला दिली. यानंतर पथकाने घटनास्थळ गाठून मुख्याध्यापक आणि शिक्षकासह पाच जणांना अटक केली.
बांकाचे उत्पादन अधीक्षक अरुण मिश्रा यांनी सांगितले की घटनास्थळावरून स्थानिक महुआ दारू देखील जप्त करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, माहिती मिळताच शाळेत एक टीम पाठवण्यात आली आहे. जिथून सरकारी बेसिक मिडल स्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक अमरेश कुमार, जगन्नाथपूर प्राथमिक शाळेचे शिक्षक बजरंगी दास, धनंजय कुमार, प्लंबर मेकॅनिक प्रदीप कुमार आणि कुमार गौरव यांना अटक करण्यात आली आहे.