मोठी बातमी.. संजय राऊतांच्या घरी ED चे पथक दाखल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या राहत्या घरी ईडीचे  पथक (ED Team) दाखल आहे. राऊत यांची गेल्या सहा महिन्यांपासून 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरु आहे. राऊत आणि त्यांच्या पत्नीवर आर्थिक गैरव्यवहार (Patra Chawl Case) केल्याची केस दाखल करण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राऊतांच्या अडचणीत वाढ 

ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच राऊत यांच्या घरी पोहोचले. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आहे. या सुरक्षा रक्षकांनी राऊत यांच्या घराबाहेर पहारा सुरू ठेवला असून कुणालाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस (ED Summons) बजावली होती. मात्र, संसदेचं अधिवेशन असल्याचं सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. त्यानंतर आज अचानक ईडीचं पथक थेट राऊत यांच्या घरी पोहोचल्याने राऊत यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना अटक होणार का ? याबाबत आता चर्चा सुरु आहेत.

मी कोणाला घाबरत नाही 

आज सकाळी संजय राऊतांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं आहे. मागच्या अनेक दिवसांपासून संजय राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. संजय राऊत सद्या त्यांच्या कुटुंबियांसोबत घरी आहेत. अनेक प्रकरणांमध्ये त्यांची आज चौकशी होण्याची शक्यता आहे. ईडीने दोनदा संजय राऊत यांना ईडीचं समन्स बजावण्यात आलं होतं. त्यावेळी मी कोणाला घाबरत नाही असं त्यांनी वारंवार सांगितलं होतं. केंद्राच्या सांगण्यावरून आमच्यावर टीका केली जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं.

बाळासाहेबांची शपथ मी घोटाळा केलेला नाही 

यावेळी संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले की, ‘तरीही शिवसेना सोडणार नाही, महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे’.

पत्राचाळ घोटाळा काय आहे ?

627 मराठी कुटूंबीय राहत असलेली पत्राचाळची जागा विकसित करण्यासाठी म्हाडाकडून संजय राऊतांचे नातेवाईक प्रवीण राऊत यांना देण्यात आली. यासाठी संजय राऊतांनी दबाव वापरल्याचा आरोप आहे. राऊतांनी 3000 मराठी कुटूंबियांसाठी घरे न बांधता 4,355 कोटींच्या पीएमसी बँक घोटाळ्याचे आरोपी वाधवानसह इतर बिल्डरांना परस्पर ही जागा 1034 कोटींना विकल्याचा आरोप आहे. 627 मराठी कुटुंबीय अजूनही बेघर आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.