मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यानं राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फ्लोअर टेस्ट म्हणजेच बहुमत चाचणी करा, असं पत्र दिलं आहे.
दरम्यान, एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन करत असतानाच, दुसरीकडे संजय राऊत यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांनी कामाठीपुऱ्यात जावं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी अलिबाग येथे शिवसैनिकांना संबोधित केलं. राज्यातील सत्तासंघर्षांच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना मेळाव्यांमध्ये मार्गदर्शन करणं सुरु ठेवलं आहे. आज अलिबागमध्ये संजय राऊत यांनी कुणीतरी माझा उल्लेख अलिबागचा पुत्र असा केलाय, असं म्हटलं.
दि.बा. पाटील हे मोठे नेते होते, बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी होते. आपल्याला या सभेनंतर कार्यक्रम करायचा आहे. करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना आपल्याला तसं करायचंय. शिवसैनिक जागेवर आहेत, आमदार वॉकरवर गुवाहाटीला चालतात, असा टोला संजय राऊत यांनी महेंद्र दळवींना लगावला.
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना कामाठीपुऱ्यात जाण्याचा सल्ला दिला ‘शिवसेनेसोबत बंडखोरी करणाऱ्या आमदारांचा दलाल म्हणून उल्लेख करीत पैशासाठी आले आणि पैशासाठी गेले, ह्याच्या पेक्षा कामाठीपुर्यात गळ्यात बोर्ड लाऊन उभे राहा’ असा बोचरा सल्ला राऊत यांनी अलिबागमध्ये बोलताना बंडखोर आमदारांना दिला.