शेंदुर्णीत बिबट्याचा एकावर जीवघेणा हल्ला

0

शेंदुर्णी ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

शेंदुर्णी मालखेडा रस्त्यावरील एका शेतामध्ये मादी बिबट्या शिरल्याचे दिसताच स्थानिक शेतमजुरांनी तीला पळविण्याचा प्रयत्न केला असता एका शेत मजुरावर प्राणघातक हल्ला करून जखमी केले. सुदैवाने इतर नागरीकांनी बिबट्याच्या तावडीतुन कशीबशी सुटका केल्याने अनर्थ टळला.

बिबट्याने हल्ला केल्याची माहिती वन विभागाला कळविली असता वनविभागाचे कर्मचारी तात्काळ हजर होऊन त्यांनी शिवाराची पहाणी केली. परंतु तोपर्यंत बिबट्या जवळच असलेल्या केळीच्या बागेत शिरला. वन विभागाने सदर बिबट्या मादी असुन गर्भवती असल्याचा निष्कर्ष तीच्या हालचालींवरून काढला. तसेच सदर बिबट्या मादी पिल्लांना जन्म देण्यासाठी सुरक्षित जागा शोधतात, त्यामुळे येथे आली असल्याचे कर्मचा-यां नी सांगितले. वन विभागातर्फे वनपाल प्रकाश देवरे, वनरक्षक वाय.एच. साळूंखे, प्रकाश सुर्यवंशी, सचिन कुमावत आदी उपस्थित होते .

वन विभागावर नाराजी

बिबट्याला पकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे. कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी कोणतेही साहित्य सोबत आणले नाही. परंतु संबंधित कर्मचाऱ्यांनी शासकीय नियमांची आडकाठी पुढे करून असमर्थता दर्शविल्याने एखाद्याचा जीव जाण्याची वाट बघत असल्याचा आरोप करत नागरीकांनी संताप व्यक्त केला.

नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण

बिबट्याने हल्ला करण्याची आज पर्यंतची पहिलीच घटना आहे. तसेच ज्या शिवारात बिबट्या घुसला आहे तेथुन नागरी वस्ती पाचशे ते सहाशे मिटर अंतरावर आहे. त्यासोबत सध्या पेरणीची कामे सुरु आहेत. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.