संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी (Patra Chawl land scam case) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांचा आर्थर रोड कारागृहामध्ये (Arthur Road Jail) मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने सोमवारी संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये ४ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान चार दिवसांपूर्वीच त्यांच्या विरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.

तसेच संजय राऊतांचे निकटवर्तीय असणारे प्रवीण राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत असून पत्राचाळ घोटाळ्यातील पैशातून अलिबागमध्ये जमीन खरेदी करण्यात आल्याचा संशय ईडीला होता. या अनुषंगाने ईडीने राऊतांवर मोठी कारवाई केली. संजय राऊतांनी प्रवीण राऊतांसह याप्रकरणी मुख्य भूमिका बजावताना पडद्याआडून काम केले आहे, असा युक्तिवाद ईडीने यापूर्वी केला होता.

राऊत यांच्याविरुद्ध प्रथम दोषारोपपत्र 1 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री अटक करण्यात आली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ‘ईडी’ आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

नेमकं प्रकरण काय ?

गोरेगावमध्ये गुरुआशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते. यावेळी प्रवीण राऊत यांनी या जागेतील एफएसआय परस्पर विकल्याचे समोर आले आहे. गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थनगर भागातील या झोपडपट्टीचे काम न करताच परस्पर काही वर्षांपूर्वी इथला एफएसआय बेकायदेशीररित्या विकण्यात आला. एचडीआयएलच्या प्रमोटर्सना पैशांची अफरातफर करण्यात मदत केली, असा आरोपही प्रवीण राऊत यांच्यावर आहे.

मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यातून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर 12 वर्षांपूर्वी 50 लाख जमा करण्यात आले होते. त्याबाबत ईडीकडून त्यांच्याकडे गेल्या दीड महिन्यापासून विचारणा सुरू होती.

Leave A Reply

Your email address will not be published.