मोदींची उमेदवारीच देणार भाजपाला ‘बुस्टर डोस’ !

जळगाव मतदारसंघाची चाचपणी : संघटनमंत्री देणार विशेष लक्ष

0

 

जळगाव, लोकशाही विशेष लेख 

लोकसभा निवडणुकीचा बिगुल अद्याप फुंकला गेला नसला तरी भारतीय जनता पक्ष ॲक्शन मोडवर असून दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच महाराष्ट्रातून उमेदवारी देवून भाजपाला ‘बुस्टर डोस’ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेषत: जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपाला अतिशय सुरक्षित वाटत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले पक्षाचे संघटनमंत्री यावर विशेष लक्ष केंद्रीत करीत असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार म्हणूनच पुढे येण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवरच त्यांच्या आगामी दौऱ्याची तयारी सुरु आहे.

राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थिती पाहता भाजपाला मोठे यश मिळणे कठीण होणार असल्याचे दिसत आहे. राज्यात गेल्या 4 वर्षांत सर्वच पक्ष सत्तेत आल्याने जनतेने नेमके कुणाला बहुमत दिले आणि लोकप्रतिनिधींनी त्याला कसे पायदळी तुडविले हे महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. भाजपाने चालविलेला राजकारणाचा हा पोरखेळ भाजपाच्याच अंगलगट येणार असल्याचे काही सर्व्हेक्षणातून स्पष्ट होत असल्याने भाजपाच्या वरिष्ठांनी त्याला गंभीरपणे घेतल्याने नरेंद्र मोदी हेच तारणहार ठरु शकतात व त्यांना उमेदवारी द्यायची वा नंतर मागे घ्यायची अशी तयारी सुरु आहे. गत निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद व वाराणसी येथून उमेदवारी दाखल केली होती. यामुळे दोघाही मतदारसंघात भाजपाला मोठे यश मिळाले, त्याचा उपयोग त्या राज्यालाही झाला. पर्यायाने राज्यांचा चौफेर विकास झाला, रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्यात, दळणवणळ वाढले. जनतेच्या मनात तेथे भाजपाविषयी आपुलकी वाढली अन्‌ त्याचा फायदा भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील झाला. हाच कित्ता महाराष्ट्रात गिरविण्यासाठी भाजप ॲक्शन मोडवर आला आहे.

जळगाव दौऱ्याचे औचित्य काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी याच महिन्यात जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचे औचित्य काय? हेच भाजप कार्यकर्त्यांच्या देखील लक्षात येत नाही. केंद्र सरकारद्वारे जळगाव जिल्ह्यात एकही मोठा उद्योग, प्रकल्प आलेला नसतांना, मोठा सरकारी वा खाजगी समारंभ नसतांना देखील मोदी महाराष्ट्रात वारंवार दौरे करीत असल्याने महाराष्ट्रातूनच त्यांची उमेदवारी निश्तिच होण्याची शक्यता आहे.

सर्व्हेक्षणातून आले शहाणपण!

गेल्या दोन महिन्यांपूर्वी भाजपाच्या अंतर्गत व्यवस्थेच्या माध्यमातून मतदारसंघनिहाय सर्व्हेक्षण करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. त्यात बहुतांश जागा धोक्याच्या पातळीवर असल्याचे दबक्या आवाजात चर्चा असल्याचे कळते त्या वाचविण्यासाठीच भाजप अन्य पक्षातील मातब्बरांना पक्षात घेत असून त्यांच्या माध्यमातून पक्ष व संघटन वाचविण्याची धडपड करीत आहे. सर्व्हेक्षणातून भाजपाला शहाणपण आलेले यातून दिसून येत आहे.

विधानसभेला होणार फायदा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावातून निवडणूक लढले तर त्याचा फायदा भाजपाला केवळ लोकसभेपुरताच नाही तर विधानसभेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. भाजपा अबकी बार फिरसे मोदी सरकारच्या घोषणा देत असले तरी महाराष्ट्रात मात्र चित्र वेगळे असू शकते आणि त्यावर मात करण्यासाठीच ही रणनीती आखली जात आहे.

राज्यातील बहुतांश विरोधीपक्ष भाजपाने साम, दाम, दंड, भेद यांच्या बळावर खिळखिळे केल्याने भाजपात सध्या आयाराम मोठ्या प्रमाणावर भरती होत आहेत. मात्र जनता या राजकारणाला कंटाळली असल्याने ते कुणाची झोळी भरतील हे येणारा काळच ठरविणार असला तरी विषाची परिक्षा नको म्हणून भाजप सावध झालेला दिसत आहे. गल्ली ते दिल्ली भाजपाला उत्तुंग यश संपादन करावयाचे असून त्या दृष्टीकोनातून त्यांनी आखणी देखील सुरु केली आहे. जर मोदींची उमेदवारी झाली तर नवल वाटू नये आणि हे त्याचेच उदाहरण असू शकते?

Leave A Reply

Your email address will not be published.