आजीच्या हाताची पारंपरिक रेसिपी: उडदाचे पौष्टिक डांगर

0

खाद्यसंस्कृती विशेष 

किती छान दिवस होते ना ते, आपला काळच वेगळा होता, आपल्या जमान्यात जी मजा होती ती या मुलांना काय कळणार ?.. अशी अनेक उदाहरणं आपल्या मोठ्यांच्या तोंडून ऐकायला मिळतात. मग रफी, बक्क्षी, आणि अजून बरेच गुणगुणायला लागतात. तुम्ही म्हणाल आज ही काय ८०/९० च्या जुन्या काळातील गाण्यांची यादी लिहून पाठवणार की काय?

तर तसे काहीही नाही..  खरंतर  old is gold असं म्हंटलं कारण आजची रेसिपी आहे ती माझ्या आजीच्या  काळातील व तिच्याच पद्धतीची अगदी सहज शक्य, सोपी आणि झटपट होणार अशी आहे. अलीकडच्या काळातील पिझ्झा, बर्गर खाणार्‍यांना या खमंग आणि रूचकर अशा गावाकडच्या पदार्थांची देखील चव चाखता यावी. ही रेसिपी तुमच्याशी शेअर करण्याचं आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे, अशा जुन्या आणि पारंपरिक पाककृती नामशेष व लोप पावत चालल्या आहेत. तर त्या सतत लोकांसमोर आणण्याचा एक प्रयत्न.

तर आजची रेसिपी आहे.. डांगर 

 

साहित्य :

१ वाटी काळे उडिद (अख्खे), ३ कांदे, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ,

 

कृती :

१. काळे उडिद मंद गॅसवर कढईमध्ये चांगले भाजुन घेतले.

२. थंड झाल्यावर ते मिक्सर मधून बारीक करून घ्यावे थोडे रवाळ असेल तरी चालेल.

३. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट, मीठ (प्रमाण चवीनुसार), दोन चमचे पाणी घालून चांगले एकत्र करून घ्यावे  वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाकरी बरोबर खायला द्यावे.

झाली ना झटपट रेसिपी, पण त्याहीपेक्षा त्याची जी चव आहे ना ती अप्रतिम अहाहा!  काळ्या उडीदाचे डांगर खाल्याने शरीराला उष्णता मिळते. माझ्या आजीने आम्हाला असेच करून खाऊ घातले आणि आम्ही आजही हे डांगर विसरलो नाही. ह्या अशा जुन्या आणि लोप पावत चालल्या पाककृतींना उजाळा देण्यासाठी आपला हा उपक्रम काही दिवस असाच सुरू ठेवूयात.. चालेल ना मग.. Old is Gold..

 

– अपर्णा स्वप्निल कांबळे – नांगरे

पत्रकार / फूड ब्लॉगर 

९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.