अहो! राजकारणाचा रंग कुठला?

0

माणसाचा रंगाशी फार जवळचा संबंध आहे. कुठल्याही गोष्टीच्या खरेदीची सुरुवात ही रंगानेच होते. गाडी असो वा बंगला त्याचा रंग कसा असावा येथूनच सुरुवात होते. लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत हे रंगाचे काय राजकारण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल मात्र राजकारणातही रंगालाच महत्त्व असल्याचे एका घटनेवरुन सिद्ध झाले आहे. झाले असे की दूरदर्शनने आपला लोगा भगव्या रंगाचा केल्याने विरोधकांचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे. गेल्या दहा वर्षात देशातील बहुतांश रंग बदलविण्यात मोदींचा हात असल्याचा आरोप विरोधकांनी केला असला तरी विरोधकांनीही आपला पाहण्याचा दृष्टीकोन बदलविला नाही हे स्पष्ट होते. रंगसंगतीही आयुष्याचा एक भाग होवून बसली आहे. पूर्वीच्या काळी भाजपवर हिरव्याचे दुष्मन असा आरोप झाला आहे, तर भाजपकडून काँग्रेसवर भगव्याचे गद्दार असे आरोप झाले आहे. रंग आणि राजकीय नेते हे समीकरण पूर्वापार चालत आलेले आहे. पुढ्याऱ्यांच्या वागण्या-बोलण्यातही ‘राजरंग’ असतोच की!
प्रत्येक पुढारी आपापल्या रंगाचे झेंडे, गमछे, टोप्या अशा प्रचारसाहित्याच्या आकर्षक पॅकेजिंगने मतदाररांवर छाप पाडण्याचा प्रयत्न करतो. हा प्रकार म्हणजे साबणासारखा आहे, कुठलाही साबण वापरला तरी ग्राहक जाणून असतो की आपली नैसर्गिक त्वचा काही फारशी बदलणार नाही, म्हणून त्यातल्या त्यात कमी आर्थिक नुकसान करेल असा साबण तो खरेदी करतो. मतदारालाही चांगले ठाऊक असते, की कोणताही पक्ष सत्तेत आला तरी जगावेगळे काही करून दाखवणार नाही, परंतु ‘दगडापेक्षा विट मऊ’ म्हणत तो त्यातल्या त्यात बरा वाटणाऱ्याला मत देतो. शेवटी साबणाची कंपनी असो वा राजकीय पक्ष दोघांचाही उद्देश एकच असतो. खरंतर दूरदर्शनचा लोगो भगवा होणे यात फार काही नवल नाही. मुद्दा आहे तो साधलेल्या मुहूर्ताचा. ऐन निवडणुकीच्या काळात, आचारसंहिता लागू असताना अचानक रंग बदलण्याची एवढी गरज का वाटली हा संशोधणाचा विषय आहे. दूरदर्शनने स्पष्टीकरण दिले आहे की डीडी न्यूजचा पूर्ण चेहरा-मोहरा बदलण्यात येत आहे आणि लोगोमधला बदल हा त्याचाच एक भाग आहे, तो भगवा नसून केशरी आहे ऐवढेच! भाजप सत्तेत आल्यापासून भगवे राजकारण हा चर्चेचा मुद्दा झाला आहे. काँग्रेसचा लोगोही तिरंग्यात आहे, हे ते विसरुण गेले एवढेच! साऱ्याचा राजकीय पक्षांना रंगाची भुरळ पडली आहे. ‘रंगात रंग तो शाम रंग’ असे साऱ्यांचेच आहे मात्र दोष तो फक्त ‘भगव्या’ला दिला जातो हे मात्र नक्की!

Leave A Reply

Your email address will not be published.