मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, जिल्ह्यात हनुमानाला साकडे..!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावेत म्हणून जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी हनुमानाला काल साकडे घालण्यात आले. काल हनुमान जयंती जळगाव शहरासह जिल्ह्यात उत्साहात साजरी झाली आणि ठिकाणी हनुमान भक्तांकडून अनेक मंदिरात हनुमान जयंती उत्साहात साजरी झाली. हनुमान मंदिरात मारुतीचे दर्शन घेण्यासाठी सकाळी रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी बुंदीच्या लाडूंचा प्रसाद वाटप करण्यात आला. तर अनेक ठिकाणी भंडाऱ्यात मोफत जेवणाचा प्रसाद देण्यात आला. राजकीय पक्षाच्या वतीने विशेषता भाजप आणि महायुतीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत म्हणून हनुमान चालीसाचे पठण करून साकडे घालण्यात आले. पाचोरा शिवसेना (शिंदे) आणि युवा सेनेच्या वतीने सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले. प्रत्येक हनुमान मंदिरात भाविकांची विशेष गर्दी होती. जिल्ह्यात बोदवड तालुक्यात असलेल्या शिरसाळा येथील हनुमान नवसाला पावणारा हनुमान आहे, म्हणून ख्याती प्राप्त आहे. काल या मंदिरात रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महायुती भाजप उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनी दर्शन घेतले. मंगळवारी मारुतीचा वार आणि मंगळवारीच हनुमान जयंतीचा मोठा योग असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिरसाळा येथील हनुमान मंदिरात जाऊन खासदार रक्षा खडसे यांनी दर्शन घेतल्यानंतर काय साकडे घातले असे विचारले असता, रक्षा खडसे म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत असे साकडे घातले, असे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, मंदिरात राजकीय पक्षाच्या विशेष भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत अशी मागणी करण्यात आली. पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वातीने पाचोरातील श्रीराम मंदिरात महायुतीच्या विजयासह पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी सामूहिक महाआरती तसेच सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले.

लोकसभेची निवडणूक आणि हनुमान जयंती योगायोगाने एकाच दिवशी आल्याने भाजपच्या वतीने हनुमान जयंतीच्या दिवशी निवडणुकीत यश मिळण्यासाठी हनुमानाला साकडे घालण्यात आले. हा जनता त्यांचा श्रद्धेचा भाग आहे. त्यामुळे त्यावर आम्ही टीका करून कोणाच्या भावना दुखावणार नाही. परंतु कर्नाटक राज्याच्या निवडणुकीत हनुमानाला साक्षी ठेऊन भाजपने निवडणूक प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फार मोठी भव्य रॅली येथे काढली. परंतु कर्नाटक राज्याचा निकाल मात्र भाजपच्या विरोधात गेला. हा एक धार्मिक भावनेच्या प्रचाराचा ताजा अनुभव म्हणता येईल. त्यामुळे हनुमान भक्तांनी विशेषतः मोदी समर्थकांनी हनुमानाला साकडे घालणे हा त्यांच्या वैयक्तिक भावनेचा विषय आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचारात धार्मिक मुद्दा घेऊ नये, असे आवाहन केले असले तरी समर्थक मतदारांनी वैयक्तिक काय करावे, हे ज्याचे त्याला स्वातंत्र्य असल्याने निवडणूक आयोग यात हस्तक्षेप करू शकत नाही. अलीकडे कुठलीही निवडणूक विकास कामांच्या मुद्द्यांऐवजी भावनिक मुद्द्यांवरच लढवल्या जात आहेत, हे विषय होय. विकासाचे तसेच जनतेच्या जिल्ह्यातील प्रश्नांवर निवडणूक लढवली जात नाही हे दुर्दैवाने म्हणावे लागते. सर्वसामान्य सामान्यांना लागणारा स्वयंपाकाच्या गॅसचा भाव आकाशाला भिडला आहे. पेट्रोल डिझेलचे भाव शंभरी ओलांडून आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला विशेषतः कापूस, सोयाबीन आणि कांद्याला कवी भाव असल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तरुण वर्गांना रोजगार नसल्याने ते हतबल झाले आहेत. तूर डाळ व इतर दाळीचे भाव कडाडले आहेत. सर्वसामान्यांना तूर डाळ खाणे परवडत नाही. जीएसटीच्या धोरणामुळे सर्वसामान्य व्यापारी त्रासले आहेत. या सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बाजूला पडलेला आहे. त्यामुळे जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न निवडणूक प्रचारातून गायब झाले आहेत. त्यासाठी भावनिक प्रश्न ऐवजी सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी निवडणूक प्रचार झाला पाहिजे हीच अपेक्षा…!

Leave A Reply

Your email address will not be published.