एैशा नरा मोजूनी माराव्यात चार पैंजणा !

0

मन की बात (दीपक कुलकर्णी)

गेल्या महिन्यातच आपण मोठ्या धुमधडाक्यात जागतिक महिला दिन साजरा करीत महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सर्वच क्षेत्र महिलांना पादाक्रांत केलेली असून स्वत:च्या हिमतीवर महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत. देशाच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपतीपदावर देखील महिला विराजमान आहे. राजकारणात महिलांचे स्थान गगनाला जात असून त्या देशाच्या हितासाठी पुढे येत असतांना काही लोक चर्चेत राहण्यासाठी महिलांवर खालच्या पातळीची टीका करीत असतात. असाच अनुभव परवा जळगाव जिल्हावासियांना देखील आला.

शिवसेना (उबाठा) गटाचे नेते संजय राऊत नावाच्या व्यक्तिने महिलांबद्दल जे शब्द वापरले ते टाळ्या घेणारे मुळीच नाही. भारतीय जनता पक्षाने जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी महिलांना संधी दिली असून हाच धागा संजय राऊत यांनी पकडत त्यांच्यावर टीकेची झोड उठविली; मात्र आपण काय बरळतोय्‌ हे त्यांच्या लक्षात आले नाही. एकीकडे महिला सक्षमीकरणाचा नारा द्यायचा आणि दुसरीकडे त्यांवर टीका करायची हे कुठले राजकारण राऊत करीत आहेत. आपल्या संस्कृतीने नेहमीच स्त्रीत्वाचा सन्मान केलेला असतांना त्यांच्यावर अशा स्वरुपाची टीका करणे कुणालाही पटणार नाही. उठता-बसता स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेणाऱ्या व्यक्तीने अशी टीका करणे शिवसैनिकांना देखील पटलेले नाही. प्रत्येकाला आया-बहिणी आहेत ना! मग संजय राऊत असे का बरळले हे कळत नाही.

जगाच्या इतिहासात स्त्रीचा दुर्दम्य आशावाद आणि परिस्थितीशी झुंजण्याच्या अजोड बळाच्या जोरावर ती सर्वांना पुरुन उरली. प्रत्येक क्षेत्रात महिला धाडसाने पुढे येत आहेत. धीटपणे व्यक्त होत आहेत. मग तो मंदिर-दर्ग्यातील प्रवेशाचा, सामाजिक अधिकाराचा प्रश्न असो, दारूबंदीसारखा धगधगता विषय असो वा निर्भया-कोपर्डीसारख्या महिला असुरक्षिततेचा विषय असो, भारतात किती तरी शतके आधी स्त्रियांना देण्यात आलेल्या सामाजिक श्रेष्ठत्वाचा दर्जा विविध सणांमधून प्रतीत होतो. मातृदिन, प्रेमाचे प्रतीक असलेला पाडवा, ममत्वाची भाऊबीज या सारख्या सणांमधून स्त्रीला मान मिळतच आला आहे. घरातील स्त्री ही महत्त्वाची आहे, याची जाणीव छोट्या-छोट्या गोष्टींमधून दिली जात होती. समाजमन सुद्धा सजग होते. स्त्रीच्या मर्यादेची जाणीव या समाजासह स्त्रीलाही होतीच. पण त्याचबरोबर तिचे सुप्त गुणही ते ओळखून होते. जसजसे समाज जीवन बदलत गेले, तसे अनेक गृहितके बदलत गेली. जडणघडण बदलत गेली आणि भावना बोथट होत गेल्या. हे फक्त पुरुषांच्या बाबतीतच नाही, तर स्त्रियांच्या बाबतीतही घडले आणि स्वत:ची अभिव्यक्तीच हरवून बसली. पुन्हा तिला मूळ प्रवाहात आणण्यासाठी हरवलेली लेखणी, गमावलेला आत्मसन्मान, चाचपडणाऱ्या दिशा शोधण्यासाठी कोणते दिव्य पार पाडावे लागले, हे सगळे आपल्याला माहीत आहे.

अन्यायाचा कडेलोट झाल्यावर पेटून उठली ती स्त्रीच. स्वत:च्या कर्तृत्वाची जाणीव होऊन गगनभरारीचे स्वप्न प्रत्यक्षात आणले ते ही स्त्रीनेच. जगाच्या इतिहासात स्त्रीचा दुर्दम्य आशावाद आणि परिस्थितीशी झुंजण्याच्या अजोड बळाच्या जोरावर ती सर्वांना पुरुन उरली. प्रत्येक क्षेत्रात महिला धाडसाने पुढे येत आहेत. धीटपणे व्यक्त होत आहेत. मोर्चे, आंदोलने, सभा या सगळ्यांची दखल सरकार दरबारी घ्यावीच लागली. प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांंदा लावून स्त्री उभी आहे. आर्थिक स्वातंत्र्य अनुभवायला शिकली आहे. तिच्या गुणांना, मतांना घरात आणि समाजातही किंमत आहे. विविध क्षेत्रे तिने पादक्रांत केली. असे असतांनाही संजय राऊत यांनी जे विधान केले ते समाजाला बिलकुल पटलेले नाही. म्हणून समाजमनाच्या मनात संत तुकाराम महाराजांचा अभंग गुणगुणला जात आहे, तो म्हणजे एैशा नरा मोजूनी माराव्यात चार पैंजणा!

Leave A Reply

Your email address will not be published.