धानोरा येथे घाणीचे साम्राज्य वाढले !

लोकप्रतिनिधी निवडणुकीत व्यस्त : नागरिक समस्यांनी त्रस्त

0

धानोरा, ता. चोपडा ;- तब्बल वीस हजार लोकवस्ती असलेल्या धानोरा येथे गेल्या अनेक दिवासांपासून घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर वाढले असून साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीकडे सफार्इ कर्मचाऱ्यांची असलेली अपूर्ण संख्या आणि लोकप्रतिनिधींची असलेली उदासीनता नागरिकांच्या आरोग्यावर उठली आहे. बऱ्याच दिवसांपासून गटारींची सफार्इ न झाल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे.

तालुक्यातील मोठ्या गावांपैकी एक असलेल्या धानोरा येथील नागरिक सध्या विविध समस्यांनी त्रस्त झालेले आहेत. सतरा सदस्य असलेल्या येथील ग्रामपंचायतीत मात्र सफार्इ कर्मचाऱ्यांची संख्या अवघी दोन आहे. नागरिकांनी वारंवार मागणी करुनही सफार्इ होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. गावातील मुख्य रस्त्यांवरील गटारी घाणीने तुडूंब भरल्या असतांनाही त्यांची सफार्इ नियमित होत नसल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राने ग्रामपंचायत प्रशासनाला अनेक वेळा पत्रव्यवहार करुन सफार्इ करण्याची सूचना केली असतांनाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी सध्या लोकसभा निवडणुकीत व्यस्त असून नागरिक मात्र विविध समस्यांनी त्रस्त झालेले आहे. बहुतांश ठिकाणी गटाचींची वाताहात झाली असून घाण पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. गटारींची नियमित सफार्इ होत नसल्याने डासांच्या संख्येने मोठी वाढ झाल्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता वाढली आहे. ग्रामपंचायतीने त्वरीत सफार्इ करावी अशी मागणी जोर धरत आहे.

‘ग्रामपंचायतीकडे सफार्इ कर्मचाऱ्यांची संख्या तोडकी असल्यामुळे नियमित सफार्इ होत नसली तरी मध्यंतरी अन्य ठिकाणाहून कर्मचारी उपलब्ध करुन गटारींची स्वच्छता करण्यात आली होती. लवकरच साफसफार्इ करण्यावर ग्रामपंचायतीचा भर राहणार आहे.
– रज्जाक तडवी, सरपंच

 

Leave A Reply

Your email address will not be published.