अवैध धंद्यांना पाठबळ देणारा शहर पोलीस ठाण्यातील ‘हिरा’!

हाकेच्या अंतरावर अवैध धंदे : पोलीस अधीक्षक लक्ष घालणार का?

0

 

जळगाव ;– शहरातील अवैध धंदे चालकांची मुजोरी वाढतच चालली असून नूतन पोलीस अधीक्षकांच्या काळात ती चांगलीच फोफावली आहे. गल्लोगल्ली अवैध धंदे सुरू असून शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर डझनभर अवैध धंदे सुरू आहे. अनेकदा त्याठिकाणी वाद आणि खुनाचे प्रकार झाले असतानाही शहर पोलीस ठाण्यातील हिऱ्याच्या आशीर्वादाने अवैध धंद्यांना प्रकाश मिळत आहे.

पोलीस अधीक्षक म्हणून डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पदभार स्विकारल्यापासून अनेक पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकारी अवैध धंदे, अंतर्गत राजकारण आणि इतर कारणांमुळे चौकशीला आणि कारवाईला सामोरे जात आहेत. विशेषत: एमआयडीसी, अमळनेर आणि शहर पोलीस ठाणे अधिकच रडारवर आले आहे. कायम चर्चेत असलेले वादग्रस्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रभारी अधिकारी देखील पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे.

एकच पोलीस ठाण्यात पाच पेक्षा अधिक सेवा
जळगाव शहरातील काही पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी वर्षानुवर्ष त्याच ठिकाणी ठाण मांडून आहेत. कोरोना काळ आणि काही राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्या बदलीला आजवर स्थगिती मिळत आली आहे. काही महाभाग तर यंदा देखील स्थगिती पदभार पाडून घेण्याच्या तयारीत आहेत. एकच पोलीस ठाण्यात तो कर्मचारी अनेक वर्ष थांबत असल्यास त्याची मुजोरी तर वाढतेच शिवाय प्रभारी अधिकाऱ्यांच्या तो जवळचा ठरतो. परिणामी इतर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये कुजबूज होत वातावरण ढवळून निघते.

पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर अवैध धंदे
जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात आणि मुख्य वर्दळीच्या ठिकाणी असलेले पोलीस ठाणे म्हणजे शहर पोलीस ठाणे. शहर पोलीस ठाण्यापासून अवघ्या 150 मीटर अंतरावर डझनभर अवैध धंदे सुरू आहेत. जुने बस स्थानक शेजारील गल्लीत चकरी-भवारा, रोलेट गेम, अवैध गॅस भरणा, जुगार अड्डा, सट्टा सुरू आहे. एकच ठिकाणी सुरू असलेल्या या अवैध धंद्यांवर आजवर बऱ्याचदा स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने कारवाई केली असली तरी शहर पोलिसांकडून ठोस कारवाई केली जात नाही.

पोलीस ठाण्यातील तो ‘हिरा’ कोण?
शहर पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकाऱ्यांच्या नावे अवैध धंद्यांना परवानगी देण्याचे काम एक हिरा करतो. अनेक अवैध धंदे तर प्रभारी अधिकाऱ्यांना माहिती देखील नसतील आणि जर माहिती असून देखील ते कारवाई करत नसतील तर त्यामागे काहीतरी आर्थिक लागेबांधे असण्याची शक्यता आहे. एकच पोलीस ठाण्यात अनेक वर्ष थांबत आर्थिक भार सांभाळणाऱ्या या कर्मचाऱ्याला पोलीस प्रशासनातील काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा आशीर्वाद असल्याने त्याचे फावले होत आहे.

पोलीस अधीक्षक लक्ष घालणार का?
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी हे अतिशय शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. आजवर दोषी व वादग्रस्त ठरलेल्या अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शहर पोलीस ठाण्याच्या बाबतीत देखील ते असा निर्णय घेणार की त्या कर्मचाऱ्याच्या बोल बच्चनमध्ये अडकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.