नेत्यांच्या जाहीर सभांनी जिल्ह्यात प्रचार शिगेला…

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील चौथ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी येत्या १३ मे रोजी मतदान होत आहे. निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी अनुक्रमे शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या जाहीर सभांमुळे प्रचार रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यात उन्हाचा तडाका वाढतो आहे. ४३-४४ अंशावर तापमान पोहोचले आहे. या वाढत्या तापमानाचा परिणाम उमेदवारांच्या प्रचारावर सुद्धा होतो आहे. अशाही परिस्थितीत रावेर मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकदा आणि उमेदवारी दाखल झाल्यानंतर ३ मे रोजी दुपारी मतदारसंघात चोपडा आणि मुक्ताईनगर येथे जाहीर सभेसाठी आले होते. उशिरा उमेदवार जाहीर केल्यामुळे दुसऱ्यांदा सभा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. त्यानंतर भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवा एकाच दिवशी जाहीर सभा झाल्या. जळगाव उद्धव ठाकरेंची तर भुसावळला देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर तोफ डागली तर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. पारोळ्याचे काका पुतण्या डॉक्टर सतीश पाटील आणि करण पवार यांचे कुटुंब तोडण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांच्यात दरी निर्माण करण्याचा स्वार्थासाठी प्रयत्न केला. परंतु पवार कुटुंबीयांनी तो धुडकावून लावून लोकसभा निवडणुकीत एकत्र आणले आणि जाहीर सभेपुढे काका पुतण्यांना उभे केले. तर अतिरेक्यांच्या विरुद्ध लढणाऱ्या एडवोकेट उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करणाऱ्या काँग्रेस बरोबर मतांसाठी उद्धव ठाकरे लाचारी पत्करून हात मिळवणी केली आहे, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी भुसावळच्या सभेत केली. एकंदरीत विकासाच्या मुद्द्यांऐवजी भावनिक मुद्द्यांवरच जाहीर सभांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची ३ मे रोजी चोपडा आणि मुक्ताईनगर येथे झालेल्या जाहीर सभा सुद्धा लक्षवेधी होत्या. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. मोदींची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू असल्याने ते पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, याची मतदारांनी दखल घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची पाचोऱ्यात जाहीर सभा झाली. वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप करीत असलेलया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शेलकी टीका केली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणणे कितपत योग्य आहे, हे आता जनतेलाच जनताच ठरवेल.

 

नेत्यांच्या जाहीर सभांमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. ४ जूनला विजय आपलाच असून आपलाच उमेदवार निवडून येणार असे प्रत्येक पक्षाच्या नेत्याकडून केले जात आहे. महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार म्हणतात यंदा परिवर्तन होणार आहेत. “आपकी बार ४०० पार” च्या भाजपच्या घोषणाची टिंगल करून “अबकी बार भाजप तडीपार” असा नारा दिला जातो आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न तरुणांची बेरोजगारी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न जीवनावश्यक वस्तू महागाई आदी मुद्दे विरोधी पक्षातर्फे करण्यात येत आहेत. तर गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात अपुऱ्या राहिलेल्या विकास आणि इतर प्रश्न सोडवण्यासाठी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करा, आपले मत पंतप्रधान मोदी यांच्यासाठी द्या आणि आपला खासदार संसदेत पाठवा असे, आवाहन भाजप नेत्यांकडून केले जात आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जशी ‘मोदी लाट’ होती, तशी लाट २०२४ च्या निवडणुकीत मात्र दिसून येत नाही. त्याचबरोबर अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा सुद्धा निवडणुकीच्या प्रचारातील खास मुद्दा दिसून येत आहे. त्यामुळे जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारांना मोदी लाटे ऐवजी ‘स्वतःचे कर्तुत्व’ प्रचारात प्रभावीपणे मांडावी लागणार आहेत. त्यामुळे २०२४ ची लोकसभा निवडणूक ही भाजपसाठी महत्त्वाची ठरणारी आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.