एकनाथ खडसे अखेर उतरले सुनेच्या प्रचारात..!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भाजपामधील घरवापसी प्रकरणावर चर्चाचर्वण चालू आहे. त्यांनी परवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. गेल्या तीन आठवड्यापासून नाथाभाऊंचे भाजप घरवापसी प्रकरण गाजत आहे. लोकसभा निवडणुकीचे अर्ज दाखल केल्यानंतर त्याची अधिकृत घरवापसी होईल असे सांगण्यात आले. परवा रक्षा खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तथापि कालही घरवापसी झाली नाही. आता लोकसभा निवडणुकीनंतर त्यांची घरवापसी होईल. आता जर त्यांना भाजपात प्रवेश दिला तर भाजपात गटाचे राजकारण होईल, असे महाराष्ट्रातील काही भाजप नेत्यांचे म्हणणे असल्यामुळे नाथाभाऊंची घरवापसी पुन्हा रखडली. एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून कालपासून सुनबाई खासदार रक्षा खडसे यांच्या रावेर लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचारात सहभाग घेत आहेत. सुनबाई खासदार रक्षा खडसे यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी ते प्रचारात उतरणार असल्याचे सांगण्यात येते. आजपर्यंत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला नव्हता. त्यांच्या भाजपातील घरवापसीलाही ब्रेक लागला होता. त्यामुळे सून रक्षा खडसेच्या निवडणूक प्रचारात जाहीरपणे ते उतरले नव्हते परंतु घरी बसून ते प्रचार करीत होते आता घरवापसी होणारच आहे, हे गृहीत धरून त्यांनी कालपासून जाहीर प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार रक्षा खडसेंना भाजपतर्फे तिसऱ्यांदा उमेदवारी दिली जात आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची भाजपची उमेदवारी मिळवण्यात एकनाथ खडसे यांचा सिंहाचा वाटा होता. परंतु २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळवण्याचे श्रेय स्वतः रक्षा खडसे यांनाच द्यावे लागेल. कारण तीन वर्षांपूर्वी एकनाथ खडसे यांनी आपली कन्या रोहिणी खडसेसह भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहण्याचा निर्णय घेऊन भाजपशी एकनिष्ठता दाखवली होती. “मी कदापी भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाही.” असे त्यांनी जाहीर केले होते. त्या एकनिष्ठतेचे फळ खासदार रक्षा खडसेंना भाजपची तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली. रावेर लोकसभा मतदार संघात भाजपची उमेदवारी मिळण्याचे संपूर्ण श्रेय रक्षा खडसे यांचेच आहे. नाथाभाऊंची सून म्हणून खडसे परिवाराविषयी नाराज असलेल्या भाजपच्या नेत्यांना रावेर लोकसभेच्या उमेदवारी मध्ये बदल हवा होता. माजी खासदार कै. हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनाच उमेदवारी मिळेल, असे चित्र निर्माण झाले होते. त्याला भाजपच्या नेतृत्वाने छेद देऊन पुन्हा रक्षा खडसेंना उमेदवारी देऊन केंद्रीय नेतृत्वाने आपले वर्चस्व दाखवून दिले. दुसरीकडे केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ खडसे यांच्या घरवापसीलाही हिरवा कंदील देऊन एका दगडात दोन पक्षी मारले असेच म्हणावे लागेल.

 

जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवारांचे मोठे शक्ती प्रदर्शन होऊन अर्ज दाखल झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जिल्ह्यातील तिन्ही मंत्री यावेळी उपस्थित होते. या शक्ती प्रदर्शनात अथवा भाजप उमेदवारांचे अर्जही दाखल झाले. त्यावेळी स्वतः एकनाथ खडसे मात्र उपस्थित नव्हते हे विशेष. आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदार संघात स्टार प्रचारकांच्या जाहीर सभांचे नियोजन करण्यात येत आहे. परंतु प्रचाराच्या या निर्णय प्रक्रियेत जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी एकनाथ खडसे यांचा समावेश केलेला दिसत नाही. २०१४ च्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे हे स्टार प्रचारक म्हणून जळगाव जिल्ह्यातच नव्हे, तर अख्या महाराष्ट्रभर फिरून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. तेव्हाचे दिवस आठवले तर एकनाथ खडसेंना काय वाटत असेल..! आज त्यांना सुनेच्या प्रचाराला उतरावे लागले. रावेर लोकसभा मतदारसंघात त्यांचे संबंध चांगले आहेत. लेवा पाटील समाज त्यांना मानतो. मलकापूर आणि नांदुरा हे रावेर लोकसभा मतदार संघाशी जोडल्या गेलेल्या विदर्भातील मतदारांसोबत नाथाभाऊंचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या प्रचाराचा खासदार रक्षा खडसेंचे मतदान वाढविण्यात निश्चित फायदा होणार आहे. परंतु एकनाथ खडसेंना जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांकडून कितपत सहकार्य मिळेल, हे मात्र सांगता येत नाही. एकनाथ खडसे यांच्या एन्ट्रीमुळे नाराज भाजपकर्त्यांमुळे निवडणूक प्रचारात विपरीत परिणाम होऊ नये हीच अपेक्षा…!

Leave A Reply

Your email address will not be published.