समर्थांचे स्मरण व शिकवण

0

लोकशाही विशेष लेख

“साक्षात शंकराचा अवतार मारुती”
“कलीमाजी झाला तोची रामदासाची मूर्ती”

असे आपले सद्गुरु रामदास स्वामी यांचे सार्थ वर्णन कल्याणस्वामी या त्यांच्या शिष्याने केले आहे. ते अतिशय समर्पक आहे. ब्रह्मचर्य व्रत, शक्ती युक्ती व बुद्धी तसेच दास्यत्व या गुणांनी मंडीत असे हनुमंत राय होते नेमके तेच गुण समर्थ रामदास स्वामी यांच्या ठायी प्रकर्षाने आढळतात. 23 एप्रिल 2024, चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती आहे.या निमित्त समर्थांसारख्या श्रेष्ठ उपासकाचे स्मरण व शिकवण याचे मनोमन दर्शन आपण घ्यायलाच हवे.

‘प्रभू रामचंद्र’ हे समर्थ रामदास स्वामींचे आराध्य दैवत होते. उपासनेचा ‘केंद्रबिंदू’ होता. ‘आमुचे कुळी रघुनाथ’ असे ते म्हणतात. प्रभू रामचंद्र त्यांना गुरुस्थानी होते. त्यांच्या उपासनेचा फार मोठा आश्रय समर्थांना लाभला. म्हणून तर ‘समर्थांचिया सेवका वक्र पाहे’ असे ते म्हणू शकतात. अतिशय समर्थपणे त्यांनी प्रभूच दास्यत्व करून स्वतःचा साधन मार्ग स्वतः आचरुन, दास्यत्व खऱ्या अर्थाने पत्करून ‘देव मस्तकी धरून’ अवघा हल्ला कल्लोळ माजविला.

रामनवमीच्या पवित्र मंगलदिनी त्यांचा जन्म झाला. हा विलक्षण योगायोग आहे. महात्म्यांच्या बाबतीत जणू सगळ्या गोष्टीच नियोजित असतात. त्यांचे असामान्यत्व त्यांच्या जीवन चरित्रात सहज दिसते. अगदी लहान वयात एकदा ते विचार मग्न अवस्थेत असताना त्यांच्या मातोश्रींनी त्यांना प्रश्न केला, बाळ कसला विचार करतोस? क्षणाचाही विलंब न करता त्यांनी उत्तर दिले “चिंता करितो विश्वाची”. पण या चिंतेने प्रश्न सुटणार नाही तर काही सक्रिय करणे भाग आहे हे ते जाणून होते. म्हणूनच पुढे बोहल्यावर चढल्यावर ‘सावधान’ हा शब्द कानी पडताच ते सावध झाले व निघून गेले. त्यांना काय प्रपंच करता आला नसता? पण त्यांना विश्वाचा संसार नेटका व सुखरूप करायचा होता. तत्कालीन राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक परिस्थिती परकीय राजवट गुलामगिरी व जुलुम यांनी सत्व नसलेली, कस नसलेली झाली होती. एका धोरणी युगप्रवर्तकाची नितांत गरज होती. हे ध्यानात घेऊन समर्थ रामदास स्वामींनी ‘बोले तैसा चाले’ म्हणून प्रथम त्यांनी नाशिक क्षेत्रे टाकळी येथे तप केले.

पूर्ण बारा वर्ष “श्रीराम जय राम जय जय राम” या त्रयोदाक्षरी मंत्राचा पाण्यात उभे राहून जप केला. बरोबरी गायत्री मंत्राचे पुरुश्चचरण केले. रात्री चार तास फक्त निद्रा घेऊन उरलेला सारा दिवस साधना व शास्त्राध्यायनात घालविला. रघुनाथाला आपलेसे करून घेतले. रामदास हे नामाभिधान सार्थ ठरविले. सर्वांगाने परिपूर्ण झालेले स्वामी आता पुढील बारा वर्षे भारत भ्रमण करणार होते व तसेच त्यांनी केले. जनमानसाची परिस्थिती अवलोकन करून त्यांना घडविण्याचे फार मोठे कार्य हाती घेतले. वस्तूतः एका जागी बसून लोकांना दर्शन द्यायचे काम केले असते तरी चालले असते पण तसे न करता रजोगुण, तमोगुण याचा पगडा असणारे अनेक अज्ञानी जीव त्यांना त्यांनी आपल्या ग्रंथसंपदेतुन घडवण्याचे कार्य सुरू केले.

“मुलाच्या चालीने चालावे I मानत मानत शिकवावे I हळूहळू सेवटा न्यावे विवेकाने I”

ही हाडाच्या शिक्षकाची भूमिका त्यांनी घेतली व प्रथम लहान मुलांसाठी ‘पावनभिक्षा’ मागितली. अभ्यास न करता देवा मला पास कर असे म्हणणाऱ्या मुलांना त्यांनी,
कोमल वाचा दे रे राम I विमल करणी दे रे राम I” व शेवटी “दास म्हणेरे सद्गुरु धाम उत्तम गुण मज दे रे राम”
उत्तम व्यक्ति घडली तरच उत्तम संघटक, उत्तम राजकारण, धर्मकारण व हरिकथा निरूपण हे शक्य असते. “सज्जन संगती दे रे राम, तद्रुपता मज दे रे राम, आत्मदिवेदन दे रे राम” इतपत उंचीवर आपल्याला जाऊन पोहोचवण्याचे आहे हे मार्गदर्शन त्यांनी मुलांना केले.

त्यात त्यांची दूरदृष्टी होती व समाजाचे घडण व्यवस्थित होण्यासाठी ‘विवेक’ व ‘वैराग्याची’ नितांत गरज होती. ते असाधारण कार्य त्यांच्या ‘पावनभिक्षेने’ केले.

आज आपण मुलांना शिकवताना त्यांचा बुद्ध्यांक पाहतो, कल पाहतो. विविध भाषा परकीय- स्वकीय शिकवतो. व्यक्तिमत्व विकासाच्या क्लासला घालतो. पण मन सक्षम, निरोगी, सशक्त व संस्कारी हवे यासाठी आपला प्रयत्न नसतो. समर्थांनी तो त्याकाळी केला. ‘मनाचे श्लोक’ लिहून त्यांनी मनाची मशागत आरंभिली

“जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे”
“जनी वंद्य ते सर्व भावे करावे”

आज पालक वर्गाने निदान पाच श्लोक मनाचे अर्थासह मुलाला शिकविले तर खरंचच त्याचा व्यक्तिमत्व अधिक खुलेल यात शंका नाही.

साधनाकाळात रघुरायाच्या कृपेने स्फुरलेली ‘करुणाष्टके’ म्हणजे आणखी एक वरदान. भक्तीत अंतरंग अधिकार कसा संपन्न करावयाचा व देवाचे भजन किती तीव्रतेने, आर्ततेने करावयाचे एक एक करुणाष्टक याचा दाखला आहे.

“स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे” “रघुपतिविना आता चित्त कोठे न राहे” अशी अचल आस भगवंताची लागायला हवी. आपल्या पूजेची सुरुवात गणरायाला नमन करून, जास्वंदाचे फुल अर्पून होते. तसेच पूजेचे सांगता या करुणाष्टकाने झाली पाहिजे .रोज पाच तरी करूणाष्टके भावपूर्ण अंत:करणाने म्हणावीत. चित्तशुद्धीचा अतिशय सुंदर असा मार्ग आपल्याला स्पष्ट दिसतो. कारण फार मोठी किमया या करुणाष्टकात आहे.

वाचताना, ऐकताना, चिंतन करताना सुख प्रदान करणारा समर्थांचा दासबोध म्हणजे बावनकशी सोन आहे. ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी व समर्थांचा दासबोध दोघांना सांगायचे तंत्वज्ञान एकच आहे पण ज्ञानेश्वरी ची भाषा सातशे वर्षांपूर्वीची आहे. ते टिके वरील भाष्य आहे. त्याला अमृताची गोडी आहे दासबोध त्या मनाने तीनशे वर्षांपूर्वीचा आहे त्याची भाषा अलीकडची वाटते. वाचताना तो सुलभ व सोपा ठरतो. गुरु शिष्याचा संवाद असे त्याचे स्वरूप आहे. शिष्य प्रश्न विचारतो व गुरु समाधानकारक उत्तर देतात. अबाल वृद्धांना सर्व स्तरावर अचूक मार्गदर्शन करणारा असा दासबोध हा समर्थांचा ‘ग्रंथराज’ आहे.अगदी अक्षर कसे काढावे त्यापासून ते
“ज्ञान म्हणजे आत्मज्ञान”
“पहावे आपणास आपण या नाव ज्ञान”

हा बोध ठायी पाडून घ्यावा असे स्पष्ट प्रतिपादन करणारा असा हा सगुण व निर्गुण दोन्ही भक्तिमार्ग चोखळणारा असा रसाळ व प्रासादिक वाणीतून सहज प्रकट झालेला ग्रंथ आहे. पण आपण श्रद्धेने व निष्ठेने त्याचा अभ्यास मात्र जरूर करावा.

“देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जिवलगासी तुटी”
“सर्वही अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा”

इतक्या निष्ठेने रामदास स्वामींनी ‘देवकार्य’ केले. अनेक नि:स्पृह महंत निर्माण केले, मठ बांधले, बालोपासनेसाठी मारुतीची मंदिरे उभी केली. “चढते वाढते वाढवावे भजन देवाचे” यासाठी तशी तरुण मंडळी घडविली.

या सर्वात आणखी एक इतिहासातील वैभवशाली नोंद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राज्यकर्ता व समर्थ रामदास स्वामी सारखे तत्त्वज्ञान यांचा मिलाफ तो ‘आनंदवनभुवन’ च स्वप्न पाहू शकला. हे अपूर्व असे भाग्यच ठरले.

श्री गणरायाची ‘सुखकर्ता दुखहर्ता’ ही आरती व ‘भीमरूपी महारुद्रा’ हे मारुती स्तोत्र म्हणजे जनमानसातील समर्थांचे हृदयातील अढळ स्थान दाखविणारी श्रद्धास्थान ठरली.

चंदनाप्रमाणे अव्याहत झिजलेले,समाजाभिमुख समर्थ रामदास स्वामी यांच्या दैदिप्यमान कार्याला, त्यांच्या पदस्पर्शाला माथा ठेऊन वंदन केल्याशिवाय आपण भक्ती मार्गावर चालू शकत नाही व पुढेही जाऊ शकत नाही. काही मर्यादा त्या ‘सेवकाला’ जाणवल्याखेरीज राहिल्या नाहीत म्हणून तर त्यांनी पुनश्च प्रार्थना केली त्यांच्या प्रिय रामरायालाच,
“कल्याण करी रामराया जनहित विवरी “
“तळमळ तळमळ होतच आहे”
“हे जन हाती धरी” आजही ‘जय जय रघुवीर समर्थ’ हे स्वर कानी पडताच आपल्याला प्रेरणा मिळते व स्फूर्ती चढते. यातच समर्थांचे ‘समर्थपण’ दडलेले आहे.
“जय जय रघुवीर समर्थ I”

लेखिका -भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.