जळगाव रावेर मतदार संघात नामसदृश्याचा फटका बसेल?

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघाच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची २९ एप्रिल ही अंतिम तारीख होती. त्यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुती महाविकास आघाडी उमेदवारांसह एकूण १४ उमेदवार तर रावेर लोकसभा मतदारसंघात २४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. जळगाव सभा लोकसभा मतदारसंघात १४ उमेदवारांमध्ये महाविकास आघाडीच्या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार करण पवार यांच्या नावाप्रमाणेच एक अपक्ष उमेदवार सुद्धा करण पवार नावानेच आहे. विशेष म्हणजे एक सारख्या नावाबरोबरच शिवसेनेच्या करण पवारांचे चिन्ह मशाल असून, त्यासारखेच ‘टेंबा’ हे चिन्ह अपक्ष करण पवार या उमेदवाराला मिळाले आहे. शिवसेनेचे करण पवार यांचे प्रमाणे अपक्ष उमेदवार करण पवार यांचे नाव आधार कार्डवर करणसिंग संजयसिंग पवार असे असल्याने शिवसेनेतर्फे दावा करण्यात आला. तथापि हा दावा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने फेटाळून लावला. सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा दबाव फेटाळला असल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे करण पवार या एक सारख्या नावाप्रमाणे चिन्हाचा सुद्धा ‘मशाल’ सदृश्य ‘टेंबा’ असल्यामुळे मतदार संभ्रमात पडून शिवसेनेच्या करण पवारांना त्याचा फटका बसण्याची शक्यता असल्याचे शिवसेनेतर्फे सांगण्यात येते. त्यासाठी या संदर्भात कोणता निर्णय घ्यायचा ते शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले असले, तरी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेलया निर्णयात तूर्तास बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे शिवसेनेला अर्थात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मतदारांना समजावून सांगण्याची मेहनत घ्यावी लागणार आहे. तरीसुद्धा आपले सुशिक्षित मतदार सुद्धा अनेक वेळा मतदान करताना चुकतात. त्यामुळे शिवसेनेच्या करण पवारांना याबाबत फार सतर्क रहावे लागणार आहे. सत्ताधारी महायुतीने जाणीवपूर्वक हा खेळ केलेला असल्याचा आरोप महाविकास आघाडीतर्फे करण्यात येतो आहे. त्यात तथ्यांश नाही, असे म्हणता येणार नाही. परंतु प्रत्येकच सत्ताधारी आपल्या सत्तेचा फायदा असा घेतच असतात. रावेर लोकसभा मतदारसंघात सुद्धा महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील हे असून, एकूण २४ उमेदवारांमध्ये इतर दोन अपक्ष उमेदवारांचे नाव श्रीराम पाटील असल्याने एकूण २४ उमेदवारांमध्ये तीन उमेदवारांची नावे एक सारखी म्हणजे श्रीराम पाटील अशीच आहेत. त्यामुळे इतर दोन अपक्ष श्रीराम पाटील नावाच्या उमेदवाराचा फटका महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना बसू शकतो. रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण २४ उमेदवार रिंगणात असल्याने मतदानासाठी दोन बॅलेट करावे लागले आहेत. त्यामुळे श्रीराम पाटील या उमेदवाराच्या ‘नामसदृश्याचा फटका’ राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना बसू शकतो. शेवटी लोकशाहीमध्ये कोणालाही निवडणूक लढविण्याचा हक्क असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी त्यात हस्तक्षेप करू शकत नाहीत. परंतु सत्ताधारी पक्षाचा हा जाणीवपूर्वक टाकलेला डाव असल्याचा आरोप विरोधकांतर्फे करण्यात येतो आहे. तरी परिस्थितीला सामोरे जाण्याशिवाय आता पर्याय नाही.

असाच प्रकार बारामती मतदारसंघात झालेला असून, एका अपक्ष उमेदवाराला तुतारी सदृश्य चिन्ह दिल्याने बारामती मतदारसंघात जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. परंतु अपक्ष उमेदवारांना चिन्ह देताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व उमेदवार आणि त्यांच्या चिन्हांच्या सर्वसमावेशक विचार करून निर्णय घ्यावा, हीच अपेक्षा असते. परंतु अनेक वेळा अनेक निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून अशा प्रकारचे संभ्रम निर्माण करणारे निर्णय दबावाने घेतले जातात. याव्यतिरिक्त आरोप करण्याशिवाय विरोधकांसमोर पर्याय नसतो. परंतु लोकशाहीमध्ये निवडणुकांसाठी मतदान फेअर पद्धतीने तसेच निर्भय वातावरणात झाल्या पाहिजेत, हीच अपेक्षा असते. परंतु अनेक वेळा सत्ताधाऱ्यांकडून त्यावर मात केली जाते हे खरे आहे. त्याचे ताजे उदाहरण अमरावतीचे देता येईल. प्रहार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेसाठी ठराविक तारखेला जे मैदान आधी बुक केले होते, तेच मैदानंतर महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार जाहीर सभेसाठी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या जाहीर सभेसाठी देण्यात आले होते. त्या संदर्भातील वाद गाजलेला आहे. परंतु सत्ताधाऱ्यांच्या या दबावाने पोलिसांनी ते मैदान महायुतीला दिले. त्यामुळे अशा घटनांना विरोधकांना सामोरे जावे लागते एवढे मात्र निश्चित…!

Leave A Reply

Your email address will not be published.