हायी गाडी माय कोणी उनी ?

0

मन की बात (दीपक कुलकर्णी)

 

अरे बघतोस काय रागाने, बाजी मारली वाघाने !

अरे येऊन येऊन येणार कोण, अमुक तमुक शिवाय आहेच कोण !

अशा घोषणा पूर्वी प्रचारात आर्वजून दिल्या जात होत्या. पूर्वीच्या काळी प्रचाराची पद्धत अतिशय साधी मात्र उच्च दर्जाची होती. आजच्या हायटेक जमान्यात सोशल मिडीयाचा वापर करुन प्रचार करण्याची पद्धत दृढ झालेली आहे. मात्र हे होत असतांना प्रचाराची पातळी कमालीची खालावली आहे हे देखील खेदपूर्वक नमूद करावे लागेल. पूर्वी (कदाचित अजूनही असेल) पहिली-दुसरीच्या बालभारतीमधे काना-मात्रा-वेलांट्या नसलेली ‘जगन कमळ बघ’ टाईप वाक्ये असत. त्यातच फेरफार करून पूर्वी भाजपवाले ‘शरद कमळ बघ’ वगैरे भिंतींवर लिखाण करुन प्रचार करीत असत. गल्ली ते दिल्लीच्या निवडणुकीत पूर्वी हिंदीवर भर असलेल्या घोषणा मोठ्या प्रमाणावर दिल्या जात असत. मराठी बहुल मतदारसंघात देखील हिंदीवर आधारीत घोणषा दिल्या जात असत.

“समय आया बांका, चुनके दो —काका” (हेच मराठीत समय आला बाका, निवडून द्या… असे होते.) असे भिंतीवर लिहीण्याची रित होती. आता भिंतीवरील प्रचार गायब झालेला आहे. सध्या हायटेक पद्धतीत होंर्डींग लावले जात आहेत. ते रिक्षावाले आणि स्पीकरवाले बिचारे बेकार झाले आता… एक जुनी रिक्षा… तिला लांब नळक्याचा स्पीकर.., आत मध्ये एक माइक वर बोलणारा.. ताई माई आक्का मारा शिक्का… एक दोन तीन चार यांची पोरे हुशार… हाई गाडी माय कोणी उनी ?  अशा प्रकारचा प्रचार होत असे. एखाद्या पक्षाची प्रचार सभा पार पडल्यानंतर तेथील साहित्य लहान मुले आवर्जुन घरी नेत कारण त्यावेळी  त्या गोष्टींचे फार आकर्षण होत.. कारण नैसर्गिक खेळणी फार होती. पण हे कृत्रिम काही तरी शाळेत मित्रांना दाखवयाला.. आणि एखाद- दुसरा वडापाव दुपारी खायला. तेवढ्यासाठी दिवस भर बुथ वर बसयाला… किती वेगळेच दिवस होते ते….पण तो काळ, ते दिवस… ती माणसे सगळच जादुमय झाले आहे.

माणूस जस जशी प्रगती करत गेला तस तसा प्रचारही हायटेक झालेला आहे. दिल्लीतील भाषण पूर्वी रेडिओवर ऐकण्याची मजा काही औरच होती. आता तर थेट हातातील मोबाईलवर भाषण ऐकण्याची संधी प्राप्त झाली आहे. एखाद्या गल्लीतला छोटाशा कार्यकर्ता हायटेक जमान्यात कधी फोकसमध्ये येईल हे सांगता येत नाही.  सध्या प्रचाराची पद्धतीही बदलेली आहे. पूर्वी शेव-मुरमुरे खाऊन कार्यकर्ते पक्षाची पताका घेवून हिंडत आता तसे राहिले नाही. आता फाईव्हस्टार व्यवस्था असली तरच कार्यकर्ते गोळा होतात. प्रचार रॅलीतील महिला तर दोन-तिनशे रुपयांच्या रोजंदारीसाठी सकाळी ह्या पक्षात तर संध्याकाळी दुसऱ्या पक्षात हे चित्र हमखास पाहावयाच मिळते. बऱ्याच वेळा विरोधी पक्षाकडून त्याचे शूटींग करण्यात येत व तो मुद्दा प्रचारात घेतला जातो. असो सागायचे असे आहे की पूर्वी लोक फार शिक्षित नसले तरी त्यांची प्रचाराची पद्धत संस्कृतीला धरुन होती, आता मात्र लोक सुशिक्षित झाले असले तरी आचरण शुद्ध झाले नाही, ऐवढेच!

Leave A Reply

Your email address will not be published.