जळगावात अ‘स्मिता’जपत रावेरात भाजपाची होणार ‘रक्षा’!

तुल्यबळ लढतीत भाजपच ठरणार वरचढ : महाविकास आघाडीही घेणार चांगली मते

0

लोकशाही विशेष (दीपक कुळकर्णी)

अठराव्या लोकसभेसाठी जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी गेल्या 13 मे रोजी मतदान झाले असून आता विजयाची गणिते आखली जात आहेत. प्रत्येक पक्ष आपलाच विजय होईल असे सांगत असला तरी ग्राऊंड रिपोर्टनुसार भारतीय जनता पक्षच वरचढ ठरणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुतीमधील सर्वच घटक पक्षांनी एकदिलाने काम केल्याने यश मिळेल असे चित्र आहे. भाजपचा गत काळातील ‘लिड’ कमी होईल मात्र यश पदरात पाडून घेण्यात त्यांना अपयश येणार नाही हेही तेवढेच खरे आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनीही चांगलीच फाईट दिल्यामुळे त्यांचे मते वाढणार आहेत. महाविकास आघाडीतील बऱ्याच ठिकाणी ‘बिघाडी’ झाल्याचे समोर येत आहे. जातीय समीकरणाच्या आधारावर विजयाचे गणित जुळविले जात असले तरी त्यात महाविकास आघाडीला फारसा लाभ होईल असे चित्र नाही. जळगावात भाजपचा उमेदवार स्मिता वाघ यांच्या समोर शिवसेना (उबाठा)चे करण पवार यांनी चांगले आव्हान उभे केले असले तरी ‘मशाली’ची धग भाजपला बसणार नाही अशी चर्चा आहे. दुसरीकडे रावेर मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी ‘काँटे की टक्कर’ दिली असली तरी तेथे भाजपासाठी ‘रक्षा’ धावून येणार आहे. एकंदरीत जिल्ह्यातील दोघाही जागांवर भाजपाचा विजय होणार असला तरी मताधिक्क मात्र घटणार आहे हे निश्चित!

मशालीची धग मात्र भाजप जपणार अ‘स्मिता’!

जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (उबाठा) यांच्या सरळ-सरळ लढत झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून दोघाही पक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. शिवसेनेकडून भाजपला टार्गेट करीत मोठे आवाहन उभे करण्याचा प्रयत्न झाला असला तरी भाजपाने हे आवाहन अंगावर घेत जशात-तसे उत्तर दिले आहे. पूर्वाश्रमीचे शिवसेना उबाठाचे नेते असलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उबाठा गटाचा राजीनामा दिल्यानंतर उबाठा गटात धक्का बसला मात्र दादांच्या भाजप पाठींब्या हवे तसे भांडवल करण्यात भाजपाला यश आले नाही. शिवसेनेकडून ग्रामीण भागात जोरदार प्रचार करण्यात आला असला तरी त्याचे मतदानामध्ये परिवर्तन करण्यात त्यांना यश आल्याचे दिसत नाही. सुरेशदादा जैन यांच्या आवाहनाला त्यांच्या समर्थक असलेल्या काही नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना उबाठाचे उमेदवार करण पवार यांच्या विजयासाठी म्हणजेच मशालला मतदान करण्यासाठीच प्रयत्न केल्याचे दिसून आले. जळगाव लोकसभा मतदारसंघातील चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 57 टक्के मतदान झालेले आहे. येथील भाजपचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण त्यांनी गेल्या तीन वर्षात चाळीसगाव शहरासह संपूर्ण विधानसभा मतदारसंघात केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास कामांची जनतेने दखल घेतली नसल्याचे चित्र दिसून येत असले तरी स्वत: मंगेश चव्हाण यांनी ही निवडणूक स्वत:साठी प्रतिष्ठेची करीत ग्रामीण भागातील मतदान भाजपच्या पारड्यात टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

दुसरीकडे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी खासदार असताना केलेल्या विकास कामांची सुद्धा जनतेने दखल घेतली नसल्याचे चित्र चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात दिसून आलेे. चाळीसगाव मतदारसंघातून कमी मतदानाची टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडते यावर येत्या विधानसभेतील गणित अवलंबून राहणार आहे. पाचोरा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार किशोर पाटील यांनीही प्रचारात हवा तसा भाग घेतला नसल्याने त्यांच्या मतदारसंघातील मते विभागली गेली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली मात्र त्याचवेळी येथील भाजप कार्यकर्त्यांच्या घरी भेट देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी टाळलेले होते, त्याची कुठेतरी कुजबूज आणि नाराजी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये होती त्याचा फटका देखील दुर्लक्षित करता येणार नाही. भाजप उमेदवार स्मिता वाघ यांचे ‘होम पीच’ असलेल्या अमळनेर तालुक्यात माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या काही समर्थकांनी येत्या विधानसभेचे गणित लक्षात घेता मशालकडे लक्ष दिल्याची चर्चा असली तरी ‘आपली सून… आपली खासदार’ अशा भूमिकेतून अमळनेरकरांना भाजपाला साथ दिली आहे. मंत्री अनिल भाईदास पाटील यांनाच महायुतीच्या कोट्यातून उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता लक्षात घेता अनिल पाटील यांनी झोकून काम केले आहे. या मतदारसंघात ‘जरांगे फॅक्टर’ सुद्धा यशस्वी झाल्याचे बोलले जात असले तरी त्याचा फायदा दोघांना फिप्टी-फिप्टी होणार आहे. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 53 टक्के मतदान झाले आहे. विद्यमान आमदार राजूमामा भोळे यांनी स्मिता वाघ यांच्यासाठी प्रयत्न करुन भाजपला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले असले तरी कमी टक्केवारीचा देखील विचार करावा लागणार आहे. जळगाव महापालिकेत शिवसेना उबाठा गटाच्या जयश्री महाजन या गेल्या टर्ममध्ये महापौर राहिलेल्या आहेत. त्यामुळे मतदारांची नाराजी नेमकी आमदारांवर आहे की महापौरांवर हे स्पष्ट होणार आहे.

अटीतटीच्या लढतीत भाजपाची होणार ‘रक्षा’!

रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यात खरी लढत झाली आहे. भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे या सलग दोन टर्मपासून खासदार असल्याने त्यांनी केलेली कामे त्यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहेत. तर राष्ट्रवादीने दिलेले उमेदवार श्रीराम पाटील हे नवखे असले तरी त्यांच्यापाठी महाविकास आघाडीची ताकद उभी राहिली आहे. भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांचे ‘होमपीच’ असलेल्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुरुवातीला खडसे कुटुंबाविरुद्ध पूर्वापार असलेली विरोधी भूमिका कायम ठेवलेली होती. मतदानाच्या शेवटच्या क्षणी भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. रक्षा खडसे यांना सुरुवातीलाच उमेदवारी जाहीर झाल्यापासून भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली मात्र नंतर नाराज कार्यकर्त्यांनी उघडपणे रक्षा खडसे यांचा प्रचार केल्याचे चित्र दिसून आलेे. प्रमुख विरोधी उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांनी स्थानिक मुद्द्यांना धरून ही निवडणूक लढवलेली दिसून आले. त्यांना या मतदारसंघातील निर्णायक असलेल्या मराठा मतदारांसह अल्पसंख्यांक मतदारांना आपल्याकडे वळविण्यात यश आल्याचे बोलले जात असले तरी अल्पसंख्यांक मतांवर एकनाथराव खडसे यांचाही मोठा पगडा असल्याने काही मते भाजपाच्या पारड्यात पडली आहे हे निश्चित! मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा विधानसभेवर निवडून गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे मुक्ताईनगर हे ‘होमपीच’ आहे. या मतदारसंघावर त्यांची पकड असून त्यांनी सून रक्षा खडसे यांच्यासाठी उघड प्रचार केल्याने त्याचा फायदा होणार आहे.

रक्षा खडसे यांना चोपडा, भुसावळ, जामनेर मतदारसंघातून मोठी आघाडी मिळणार असल्याचे संकेत आहेत. पहिल्यांदाच थेट लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादीच्या श्रीराम पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत सलग दोन वेळा भाजपतर्फे खासदार राहिलेल्या रक्षा खडसे यांना चांगली लढत दिल्याचे बोलले जात आहे. श्रीराम पाटील यांनी स्थानिक मुद्दांना हात घालून मते मागितली असल्याने त्यांना त्याचा काही प्रमाणात फायदा होणार हे पक्क आहे. रक्षा खडसे आणि श्रीराम पाटील यांचा जनसंपर्क याचा विचार केला तर त्यात रक्षा खडसे ह्या उजव्या ठरणार आहेत. एकंदरीत विचार केला तर रक्षा खडसे ह्या भाजपासाठी खऱ्या अर्थाने ‘रक्षा’ ठरणार असल्याची स्थिती आहे. रोहिणी खडसे यांनी भाजपाच्या विरोधात प्रचार केला असला तरी त्याचा काही परिणाम होईल असे चिन्ह दिसत नाही. श्रीराम पाटील यांच्यासाठी महाविकास आघाडीमधील शिवसेना, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मात्र नावालाच दिसून आल्याने त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.