प्रत्येकाचे दरडोई उत्पन्न साडेतीन लाखा पेक्षा जास्त करणार !
महायुतीचे उमेदवार नारायण राणेंचे आश्वासन
कणकवली, लोकशाही न्यूज नेटवर्क
उद्योजक घडवण्यासाठी, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळण्यासाठी युवकांना तांत्रिक प्रशिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिले जाणार आहे. त्यासाठी 200 कोटींचे टेक्निकल ट्रेनिंग सेंटर कुडाळ तालुक्यातील ओरोसमध्ये उभारत आहे. दोडामार्ग कुडाळ आणि कणकवलीसह वैभववाडीमध्ये 500पेक्षा जास्त कारखाने आणणार आहे. हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या उपकरणांचे कारखाने दोडामार्गला उभारणार आहे. फळप्रक्रिया उद्योग आणणार आणला जाणार आहे. 2025 पर्यंत येथील जनतेच्या जीवनात आमूलाग्र असा प्रगत विकास करून प्रत्येकाचे वार्षिक दरडोई उत्पन्न तीन ते साडेतीन लाखा पेक्षा जास्त असेल असा विकास करणार, असे आश्वासन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी दिले.
कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघाची प्रचार सभा असलदे येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी राणे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोकणाला चांगल्या कर्तबगार खासदार, आमदारांची गरज आहे. सिंधुदुर्गातील जनतेने मला सहा वेळा विधानसभेत निवडून दिले म्हणून मी मुख्यमंत्री झालो. मी पहिल्यांदा आमदार होण्याआधी सिंधुदुर्गात रस्ते पाणी वीजची अपुरी सुविधा होती. महिलांना रोजगाराचे साधन नव्हते. आज जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न 2 लाखाच्या वर आहे. आज जिल्ह्यात हॉस्पिटल, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, दर्जेदार रस्ते, मुबलक वीज पाणी पुरवठा सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी राणे कुटुंब सदैव झटत आहे, असे नारायण राणे यांनी सांगितले.
यावेळी आमदार नितेश राणे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, माजी जि प सदस्य संजय देसाई, पंढरी वायंगणकर, प्रकाश पारकर, भाजपा महिला तालुकाध्यक्ष हर्षदा वाळके, उपतालुकाध्यक्ष पूजा जाधव, माजी पं स सभापती भाग्यलक्ष्मी साटम, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, ओटव सरपंच रुहिता तांबे, कासार्डे सरपंच निशा नकाशे, दारूम सरपंच तेजस्वी लिंगायत, तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, कोळोशी सरपंच आचरेकर असलदे उपसरपंच सचिन परब आदी सह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना नारायण राणे यांनी विरोधी विनायक राऊत यांचाही समाचार घेतला. राऊत यांनी 10 वर्षे खासदारकी काळात एकही विकासकाम केले नाही.
उद्या खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मी केंद्रात मंत्री असणार आहे. उद्योजक घडवण्यासाठी युवकांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी 200 कोटींचे टेक्निकल ट्रेनिंग सेंटर ओरोसमध्ये उभारत आहे. दोडामार्ग कुडाळ आणि कणकवली सह वैभववाडी मध्ये 500 पेक्षा जास्त कारखाने आणणार आहे. हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या उपकरणांचे कारखाने दोडामार्गला उभारणार आहे. फळप्रक्रिया उद्योग आणणार आहोत. चिपी विमानतळाला विरोध करायला विनायक राऊत आघाडीवर होता. मात्र जेव्हा चिपी विमानतळ पूर्ण झाल्यानंतर उदघाटन करताना स्वागताला विनायक राऊत होता. राऊतांनी थोडीतरी लाज बाळगावी. सी वर्ल्ड ला विनायक राऊत ने विरोध केला. विजयदुर्गला 4 हजार कोटींचे आधुनिक बंदर होत असताना त्यालाही राऊत ने विरोध केला. मायनिंग मध्ये जाऊन राऊत चा मुलगा हफ्ते घेतो.
राऊतांनी केला विरोध
तीन लाख कोटी गुंतवणूक असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प सुद्धा नको म्हणत राऊतने विरोध केला. जैतापूरचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प होऊ नये म्हणून उद्धव ठाकरेने काही उद्योजकांकडून कोट्यवधी रुपये घेत विरोध केला. कोकणात राऊतने एकही प्रकल्प आणला नाही. भाजपा संविधान बदल करणार असा खोटा प्रचार केला जातोय. काँग्रेस राजवटीत 80 वेळा राज्य घटनेत बदल केला. संविधान बदल करणार असा खोटा प्रचार केला जातोय, असे त्यांनी यावेळी सांगितले.