भक्तीचा फुलविता मळा, लागला लोकसभेचा लळा !

0

मन की बात (दीपक कुलकर्णी)

जाण्या लोकसभेच्या दारी, साधू – महंतांची मांदियाळी !

भक्तीचा फुलविता मळा, लागला लोकसभेचा लळा !!

भक्तीचा मळा फुलविणारे साधू-संत सध्या निवडणुकांचे आखाडे गाजविण्यात मग्न झालेले दिसून येत आहेत. धर्माचा प्रचार-प्रसार करण्याचे काम करणारे साधू-संत आता लोकशाहीच्या मंदिरात सेवा करण्याच्या उद्देशाने आपले नशिब आजमिवण्यात दंग झालेले आहेत. पूर्वी साधू-संत राजकारणापासून कोसो दूर असत मात्र सध्या साधू-संतांनाच राजकारणात येण्यासाठी पायघड्या घातल्या जात आहेत. राजकारण आणि धार्मिक ध्रूवीकरण हे जुने नाते आहेच ! उत्तरप्रदेशात भारतीय जनता पक्षाने योगी आदित्यनाथ यांनी थेट मुख्यमंत्री करुन राजकारणात उडी घेण्यास भाग पाडले. योगी आदित्यनाथ यांचा तेथील संप्रदायावर असलेला पगडा भाजपसाठी फायदेशीर ठरत आहे.

उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या नाशिक येथील निवडणुकीतही शांतिगिरी महाराजांनी उडी घेतल्याने अन्य पक्षांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. शांतीगिरी महाराजांनी नाशिक लोकसभेसाठी अर्ज भरल्यानंतर आता साधू , महंत, महाराजही उतरले लोकसभेच्या आखाड्यात, अशी चर्चा सुरू झाली पण या साधू , महाराजांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणे हे महाराष्ट्राला काही नवीन नाही. महाराष्ट्रात 2004 ते 2019 या 15 वर्षांच्या काळात तब्बल आठ एक साधू , महंत, महाराजांनी लोकसभेची निवडणूक लढवली आहे. भाजपकडून 2019 मध्ये सोलापुरातून निवडणूक लढवलेल्या श्री जय सिद्धेश्वर स्वामींनी तर मोठ्या फरकाने विजय मिळवत थेट दिल्ली गाठली होती. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनाही पराभूत व्हावे लागले होते. याच निवडणुकीत श्री वेंकटेश्वर महास्वामीजी अपक्ष म्हणून लढले होते मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

केवळ भारतीय जनता पक्षानेच नव्हे तर गत काळात बहुजन समाज पक्षाने देखील साधू , महंतांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. बसपकडून 2009 मध्ये श्री महंत सुधीरदास महाराज यांनी नाशिकमधून निवडणूक लढवली होती. 2014 मध्ये नगर येथून बहुजन मुक्ती पार्टीकडून निवडणूक लढलेल्या ह.भ.प. अजय बारसकर महाराज देखील रिंगणात होतेच !

2019 मध्ये जळगाव येथून हिंदुस्थान निर्माण दल या पक्षाकडून निवडणूक लढलेल्या संत श्री बाबा महाहंसजी महाराज पाटलांनी देखील नशिब आजमिवले होते, मात्र त्यांना पराभवाचे तोंड पाहवे लागले. मुंबई उत्तर येथून अखिल भारत हिंदू महासभा या पक्षाकडून निवडणूक लढलेल्या महंत श्रीराम स्वरूपदास महाराज अयोध्यावाले,  मावळ येथून अपक्ष लढलेल्या ह.भ.प. आर. के. पाटील यांनीही आखाड्यात उडी घेतलीच होती. शांतीगिरी मौनगिरी महाराज पहिल्यांदाच नव्हे तर दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

यापूर्वी त्यांनी 2009 मध्ये छत्रपती संभाजीनगरमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. यावेळी शांतीगिरी महाराज नाशिकमधून निवडणूक लढत आहेत. त्यांनी अर्ज देखील भरला आहे मात्र केवळ शांतिगिरी महाराजच नव्हे तर आणखी काही साधू, महंत नाशिकच्या आखाड्यात उतरण्यासाठी इच्छुक असल्याचे कळते. असो, राजकारणाची भुरळ प्रत्येकाला असते, तशी ती साधू-संतांना देखील पडली आहे. धार्मिक कार्यात सातत्याने सक्रीय असलेल्या साधू-संतांचा जनसंपर्क चांगला असल्याने ते त्याचा फायदा घेण्याच्या प्रयत्नात असतात, तो फायदा त्यांना होती की नाही, हे माहित नाही मात्र साधू-संतांनी खांद्यावर घेतलेली ‘लोकशाही’ची ही पताका मनाला स्पर्श करुन जाते एवढेच!

Leave A Reply

Your email address will not be published.