लोकशाही संपादकीय लेख;
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी परवा मतदान पार पडले. महाराष्ट्रातील १३ आणि देशातील ४९ लोकसभेच्या जागांसाठी पाचव्या टप्प्यासाठी मतदान झाले. महाराष्ट्रातील चार टप्प्यात एकूण ३५ जागांसाठी मतदान पार पडले होते. २० मे रोजी महाराष्ट्रातील एकूण १३ जागांसाठी म्हणजे मुंबईतील सहा आणि ठाणे, कल्याण, भिवंडी तसेच धुळे, नाशिक, पालघर आणि शिर्डी अशा 13 जागांसाठी जे मतदान झाले ते अत्यंत संथ गतीने तर झालेच वर मतदानाची टक्केवारी सुद्धा ५१ % इतकीच झाली. लोकसभेच्या पहिल्या चार टप्प्यात झालेली मतदानाची कमी टक्केवारी यावर सर्वच राजकीय पक्षांमध्ये तसेच शासकीय यंत्रणांमध्ये चिंतेचा विषय बनला असतानाच परवा झालेल्या पाचव्या टप्प्यातील त्यापेक्षा कमी मतदानाच्या टक्केवारीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबईमध्ये ज्या संत गतीने मतदान झाले आणि टक्केवारी घसरली त्याबाबत सर्वांचे चिंता वाढली आहे. आतापर्यंत उष्णतेच्या लाटेमुळे मतदार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडत नाहीत, अशा प्रकारे निसर्गाला दोष देऊन स्वतःवरची जबाबदारी शासकीय यंत्रणेने झटकली. परंतु उष्णतेचे कारण मुळी नव्हतेच. त्याला शासकीय निवडणूक यंत्रणा आणि निवडणूक अधिकारी यांचे नियोजन जबाबदार असल्याचे मुंबईमधील मतदान केंद्रातील नियोजनाने स्पष्ट झाले आहे. मतदारांना मतदान केंद्रावर मतदान करताना स्वतःजवळ मोबाईल ठेवता येणार नाही, असा नियम असल्याचे कधीही निवडणूक यंत्रणेने जाहीर केले नाही. तथापि मतदारांना हा नियम माहित नसल्याने बहुतेक मतदारांजवळ मोबाईल होते. त्यामुळे रांगेत उभे राहिलेल्या, मोबाईल असलेल्या मतदारांना जेव्हा मतदान केंद्रात मतदान करण्यास मज्जाव करण्यात आला, तेव्हा अनेक मतदार मोबाईल घरी ठेवायला गेले ते परत आलेच नाहीत. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरला. याला पूर्णतः महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप सर्व स्तरातून केला जातोय. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन संथ होणाऱ्या मतदान तसेच टक्केवारी घसरण्याच्या प्रकारावर शासकीय यंत्रणेवर ठपका ठेवला. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय आरोप करून ‘विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली म्हणून असे आरोप करत आहेत,’ असा प्रति आरोप केला. राजकीय आरोप प्रत्यारोपाने घसरलेल्या टक्केवारीचा प्रश्न सुटणार नाही. अशा प्रकारे राजकारणाच्या आरोप प्रत्यारोपामुळे प्रश्न सुटण्याऐवजी प्रश्न किचकट बनतोय आणि याचा फायदा शासकीय अधिकाऱ्यांकडून घेतला जातो आहे. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांना फावते. म्हणून लोकशाही मजबूत राहण्यासाठी राजकारण बाजूला सारून विरोधक आणि सत्ताधारी पक्षांनी एकत्र येऊन असे प्रश्न हाताळले पाहिजेत असे आमचे स्पष्ट मत आहे..
जळगाव जिल्हाधिकारी अर्थात जिल्हा निवडणूक अधिकारी आयुश प्रसाद यांनी मतदानाचा टक्का वाढावा म्हणून लोकसभा निवडणूक घोषित होण्याच्या दोन महिने आधीपासून जिल्ह्यात अनेक प्रकारे मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मतदारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून राबविलेल्या अनेक उपक्रमांचे कौतुक करावे इतके थोडेच आहे. त्यामुळेच २०१९ पेक्षा २०२४ मध्ये उष्णतेची लाट असताना सुद्धा मतदानाचा टक्का दोन टक्क्याने का होईना, वाढलेला होता. जळगाव लोकसभा मतदारसंघा पेक्षा रावेर लोकसभा मतदारसंघात जवळजवळ १९ च्या तुलनेत तीन टक्के पेक्षा जास्त मतदान झाले. त्यामुळे शासकीय निवडणूक यंत्रणेवर जरी राज्य पातळीवर दोष दिला जात असला, तरी जळगाव जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेने चांगले कार्य केले आहे. त्याबाबतचे श्रेय तरुण उत्साही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देणे आवश्यक आहे…!