नाव, पक्षचिन्ह नव्हे उमेदवाराचा अनुक्रमांक मतदारांसमोर !

पक्षफुटींमुळे गोंधळ : कार्यकर्त्यांची शक्कल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यातील सत्तासंघर्ष, दोन महत्त्वाच्या पक्षांमध्ये पडलेली फूट, या सर्वामुळे यावेळच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांपर्यंत पक्षचिन्ह पोहोचवण्याचे प्रमुख आव्हान महायुती व महाविकास आघाडीसमोर होते. या पार्श्वभूमीवर मुंबईतील जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी सोमवारी मतदानादरम्यान उमेदवाराचे नाव किंवा पक्षचिन्हाऐवजी ईव्हीएम मशिनवर असलेला उमेदवाराचा अनुक्रमांक मतदारांपर्यंत पोहोचविण्याची शक्कल लढवल्याचे दिसून आले. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हा क्रमांक पोहोचविण्यासाठी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची फळी सहाही मतदारसंघांत सक्रिय असल्याचे चित्र दिसून आले.

राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेत पडलेली उभी फूट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेले दोन गट यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणात होते. पक्षफूट आणि राजकीय पक्षांची झालेली सरमिसळ यांमुळे मतदारांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला होता. उमेदवारांना निवडणूक प्रचारात याची जाणीव होत होती. त्याशिवाय राज्यातील पहिल्या चार टप्प्यांत अपेक्षित पक्षचिन्ह नसल्याची मतदारांनी केलेली तक्रार लक्षात घेता, मुंबईतील मतदानावरही परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे मुंबईत जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी शेवटच्या टप्प्यात ‘अनुक्रमांका’चा प्रयोग अंमलात आणला.

अशिक्षित मतदार किंवा ज्येष्ठ नागरिकांपर्यंत उमेदवारांची माहिती पोहोचविण्यासाठी याआधीही हा प्रयोग करण्यात आला आहे; परंतु यंदा तो मुंबईतील जवळपास सर्वच मतदान केंद्रांवर प्रकर्षाने जाणवला. अनेक मतदारसंघांत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या नावाचेच आणखीही उमेदवार असल्याने, तसेच फुटीमुळे पक्षचिन्ह बदलले गेल्याने मतदानात फटका बसण्याची भीती होती. त्यातूनच आम्ही ‘अनुक्रमांक’ मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयोग राबविला अशी माहिती दक्षिण मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उच्च पदस्थ पदाधिकाऱ्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.