साहित्य संमेलनास उपस्थित साहित्यिकांचे स्वागत

0

लोकशाही संपादकीय लेख 

 

आज शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी पासून अमळनेर येथील साने गुरुजी साहित्य नगरीत होत असलेल्या तीन दिवसीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी अनेक साहित्यिक अमळनेर येथे दाखल झाले आहेत. या संमेलनास उपस्थित सर्व साहित्यिकांचे तसेच मराठी साहित्य रसिकांचे खानदेशवासीयातर्फे अगत्यपूर्वक स्वागत. तीन दिवसांच्या या साहित्य संमेलनात आयोजित भरगच्च कार्यक्रमांचा मनःपूर्वक आनंद त्यांनी लुटावा. खानदेशी मेजवानीचा मनमुराद आस्वाद घ्यावा.

अमळनेर हे जळगाव जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण ग्रामीण भागातील असले तरी पूज्य साने गुरुजींची ती कर्मभूमी असून त्यांच्या वास्तव्याने पवित्र झालेली ही भूमी आहे. ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ हा संदेश देणारे साने गुरुजी आज हयात नसले तरी त्यांच्या पवित्र स्मृतींच्या आठवणीला उजाळा मिळणार आहे. याआधी ७१ वर्षांपूर्वी १९५२ साली सुद्धा अमळनेर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. त्या साहित्य संमेलनाला सुद्धा दुर्दैवाने पूज्य साने गुरुजी हयात नव्हते. यावेळी दोनच वर्षांपूर्वी त्यांचे निर्वाण झाले होते. दुसऱ्यांदा आता ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरत होत आहे. साने गुरुजी हे एक फार मोठे साहित्यिक होते. मातेचे हृदय असलेला महामानव अशी उपमा त्यांना अनेकांनी दिलेली आहे. त्यांनी विपुल असे साहित्य निर्माण केले आहे. साने गुरुजींचे साहित्य रडके साहित्य म्हणून हिणवणारे समीक्षक महाभागही होऊन गेले. तथापि साने गुरुजींच्या साहित्याची खरी पारख साहित्यसम्राट कै. आचार्य अत्रे यांनी केली. त्यांच्या श्यामची आई यावर निर्मित चित्रपटाला पहिले राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले. ही ताकद पूज्य साने गुरुजींच्या साहित्यात असल्याचे आचार्य अत्रेंनी दाखवून दिले. अशा या उच्चकोटीचे साहित्यिक, समाजसुधारक साने गुरुजींच्या कर्मभूमीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास लाख लाख शुभेच्छा.

साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन पार पडत आहे. २ फेब्रुवारीला होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात डॉ. रवींद्र शोभणे यांचे अध्यक्ष भाषण होणार आहे. साने गुरुजींच्या कर्मभूमीत होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून अध्यक्ष भाषणात ते कोणते विचार मांडतात यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत. यंदाच्या साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या शुभारंभाच्या आदल्या दिवशी म्हणजे एक फेब्रुवारीला साने गुरुजींची साहित्य नगरीत पार पडलेल्या बाल साहित्यिकांचे संमेलन होय. बालकांमध्ये साहित्य विषयी रुची निर्माण व्हावी म्हणून आयोजित केलेल्या या बालसाहित्यिक संमेलनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. बालकांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे बालसाहित्य संमेलन यशस्वी ठरले. बाल साहित्यिकांनी सादर केलेल्या त्यांच्यातील कला गुण पाहून अनेकांनी स्तुती सुमने वाहिली.

शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता झेंडा वंदनाने संमेलनाला सुरुवात होऊन शहरातून ग्रंथदिंडी निघेल. त्यानंतर प्रताप महाविद्यालयाच्या आवारात वास्तविक या परिसरात साने गुरुजींचे वास्तव्य होते. त्या परिसरातच हे साहित्य संमेलन होत असल्याने त्यात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मुख्य उद्घाटन सोहळ्यासाठी भव्य असे व्यासपीठ उभारण्यात आले असून हजारो रसिकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात परिसरात कविवर्य कै. ना. धो. महानोर आणि कवी कवयित्री बहिणाबाई चौधरी सभागृह उभारण्यात आले असून त्या दोन्ही सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या विविध कार्यक्रमांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमास अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित राहणार असून संमेलनाच्या स्वागताध्यक्ष मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील सर्वांच्या स्वागतासाठी व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत…!

Leave A Reply

Your email address will not be published.