पाटील पवारांच्या ‘राशीला’.. निष्ठावतांनी गमावले ‘उमेदवारी’ला !

0

मन की बात (दीपक कुलकर्णी)

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक पक्षात नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. प्रत्येकाची समजूत काढण्यात पक्ष श्रेष्ठींच्याही नाके नऊ येत असून बंडाळीची शक्यता वाढली आहे. जळगाव व रावेल लोकसभा मतदारसंघात इच्छुकांची भलीमोठी यादी रोजच हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढतच जात असल्याने कुणाला उमेदवारी द्यावी आणि कुणाला नाही असा प्रश्न महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर सतावत आहे.

महाविकास आघाडीच्या निर्णयानुसार जळगाव उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे तर रावेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहे. शरद पवार यांनी अद्यापही आपला पत्ता बाहेर काढला नसल्याने तेथे इच्छुकांची झोप उडाली आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी करण पवार या नवख्या उमेदवाराला संधी देत भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. करण पवार हे भाजपचे माजी नगराध्यक्ष असून ते खासदार उन्मेष पाटील यांच्या सोबत शिवबंध बांधण्यासाठी गेले आणि उमेदवारीची माळच गळ्यात घालून बाहेर पडले. करण पवार हे उमेदवार जरी असले तरी त्यांच्यासाठी खासदार उन्मेष पाटील यांना अधिकाधिक कष्ट उपसावे लागणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडामुळे शिवसेनेचे दोन तुकडे झाले. त्यावेळी जिल्ह्यातील सर्वच आमदार, वरिष्ठ पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या तंबूत दाखल होत उद्धव ठाकरे यांच्यासमोर समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न केला; त्यावेळी काही निष्ठावंत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. मध्यंतरी आदित्य ठाकरे यांच्या जनसंवादाचे जोरदार नियोजनही केले. हे करत असतांना हे निष्ठावंत लोकसभेची उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून होते; असे असले तरी त्यातील एकाही निष्ठावंताला ठाकरेंनी उमेदवारीसाठी पुढे केले नाही.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना विस्कळीत झालेली असताना तिचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काही प्रमाणात या निष्ठावंतांना पुढाकार घेतला मात्र त्यांच्या हाती केवळ ‘मशाल’च आली…. उमेदवारी मात्र दुसऱ्याच्या पथ्यावर पडली. उमेदवारी मिळेल या अपेक्षेने ॲड. ललिता पाटील यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता भाजपची साथ सोडली मात्र हाती काय आले? भाजपला तगडे आव्हान उभे करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असला तरी ‘हे’ निष्ठावंत आता ‘निष्ठे’ने काम करतील काय? हाच खरा प्रश्न आहे. खासदार उन्मेष पाटील यांनीही तशी घाईच केली आहे, मात्र ते निष्ठावंतांच्या एक पाऊल पुढे गेले कारण त्यांनी लागलीच आपल्या सख्याला उमेदवारी मिळवून दिलेली आहे. एकंदरीत काय तर पाटील पवारांच्या ‘राशीला’…निष्ठावतांनी गमावले ‘उमेदवारी’ला अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.