शिंदेंची प्रतिष्ठा लावली पणाला, भाजपने खेचल्या 3 जागा

हक्काच्या जागांवर ‘काट’ : सेनेला ‘शह’

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात ठाण्याची जागा प्रतिष्ठेची जागा करुन भाजपने तीन जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. शिंदेंच्या शिवसेनेला ठाण्याचा आवळा देऊन भाजपने तीन जागांचा कोहळा काढला आहे. ठाण्याची जागेचा विषय ताणून धरत भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर आणि दक्षिण मुंबई असे तीन मतदारसंघ खेचले आहेत. त्यामुळे मुंबई, कोकण पट्ट्यात शिंदेसेनेला तीन जागा गमवाव्या लागल्या आहेत.

भाजपने सुरुवातीपासूनच ठाण्यावर दावा सांगितला. इथे असलेल्या भाजपच्या ताकदीचा मुद्दा वारंवार अधोरेखित करण्यात आला. वातावरण निर्मिती केली गेली. त्याचवेळी शिंदेसेनेच्या मातब्बर खासदारांची तिकिटे कापण्यास भाग पाडून दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केली. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना ठाणे गमावले तर शिवसैनिकांमध्ये अतिशय चुकीचा संदेश जाईल या कल्पनेमुळे शिंदेसेनेत अस्वस्थतता निर्माण झाली.

ठाण्याचा विषय भाजपने ताणून धरल्याचे पाहून शिंदेंनी देखील डाव टाकण्यास सुरुवात केली. त्यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर केली नाही. जोपर्यंत ठाण्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत कल्याणचा उमेदवार जाहीर करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. शिंदेंच्या खेळीचा अंदाज आल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदेंची उमेदवारी परस्पर जाहीर करुन टाकली. पण शिंदेंनी त्यांच्या लेकाची उमेदवारी अद्यापही अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.

ठाण्यावरील दावा कायम ठेवायचा, तो अधिकाधिक भक्कम करायचा आणि त्या बदल्यात एकेक मतदारसंघ काढून घ्यायचा असा डाव भाजपने आखला. त्यानुसार रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिंदेसेनेकडून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण लढण्यास उत्सुक असताना, मतदारसंघावर त्यांचं वर्चस्व असतानाही भाजपनं ही जागा खेचून घेतली. इथून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उमेदवारी देण्यात आली.

पालघर मतदारसंघाचे खासदार राजेंद्र गावित 2019 पर्यंत भाजपमध्ये होते. पण त्यावेळी झालेल्या जागावाटपात उद्धव ठाकरेंनी ही जागा मागून घेतली. त्यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांना उमेदवारी दिली गेली. गावित विजयी झाले. आता गावित यांची घरवापसी करुन त्यांना कमळावर लढण्यास सांगण्याचा भाजपचा मानस आहे. त्यामुळे ही जागा भाजपच्या पदरात पडेल.

Leave A Reply

Your email address will not be published.