भाजपमधील नाराजवीरांवर महाविकास आघाडीचा डोळा !

उन्मेश पाटील, ए.टी. पाटलांना गळाला लावण्याचे प्रयत्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून भाजपाने जिल्ह्यातील दोघाही मतदारसंघात उमेदवार घोषित केले असून नाराजीनाट्याला सुरुवात झाली आहे. भाजपातील नाराज विद्यमान खासदार उन्मेष पाटील, माजी खासदार ए.टी. पाटील यांना गळाला लावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा होतांना दिसत आहे. रावेर मतदारसंघासाठी भुसावळचे माजी आमदार संताष चौधरी हे राष्ट्रवादीकडून इच्छुक असले तरी त्यांना अंतर्गत विरोध होतांना दिसत आहे. रावेरसाठी राष्ट्रवादी संताष चौधरींऐवजी दुसऱ्या उमेदवाराचा देखील शोध घेत आहे. जळगाव व रावेर मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार सुरु झाला आहे. मात्र, अद्यापही दोन्ही मतदारसंघातील उमेदवार महाविकास आघाडीतर्फे जाहीर करण्यात आलेले नाहीत. कोणत्याही परिस्थितीत भाजपाला निवडणूक सोपी होवू नये यासाठी रणनिती आखली जात आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत ठाकरे गटाच्या वाट्याला आली आहे. मागील आठवड्यात उमेदवार जाहीर करण्याची घोषणा करणाऱ्या ठाकरे गटाने भाजपाने विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे तिकट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्याने आपली उमेदवार निश्चिती लांबवली आहे. उद्धव ठाकच्या शिवसेनेत दाखल ॲड. ललिता पाटील यांच्या उमेदवारीबाबत अद्यापही संकेत मिळत नसल्याने शिवसेना दुसऱ्या उमेदवाराचा शोध घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्मिता वाघ यांच्या जमेच्या बाजू तसेच कच्चे दुवे अभ्यासूनच उमेदवार देण्याची रणनिती आखली आहे. ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या माध्यमातून स्वत: उद्धव ठाकरे उमेदवाराची चाचपणी करीत आहेत. ठाकरे गटातून माजी महापौर कुलभूषण पाटील, जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने व भाजपातून नुकत्याच ठाकरे गटात आलेल्या ॲड. ललिता पाटील यांची नावे सध्या आघाडीवर असले तरी शिवसेना भाजपातील नाराजांवर लक्ष ठेवून आहे.

पवार गटाकडून अद्याप स्पष्टता नाही

महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाकडे रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा आहे. अचानक येथून निवडणुक लढविण्यास ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी नकार दिल्याने निर्माण झालेला पेच अद्याप पवार गटाकडून सुटलेला नाही. भाजपाकडून सून लढत असल्याने खडसेंकडून ही जागा बाय देण्याचा आरोप व पक्षांतर्गत खडसेंवरील टीकेमुळे शरद पवार यांनी सावध पावित्रा घेतला असून सक्षम उमेदवाराचा शोध सुरु केला आहे. येथून जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, तुप्ती बढे यांची नावे चर्चेत असतांना अचानक भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी इच्छा व्यक्त केल्याने त्यांच्या नावावर सध्या खल सुरु आहे. चार दिवसांपासून यासाठी चर्चा सुरु असून अद्यापही स्पष्टता नसल्याने इच्छुक संकटात आहेत.

चौधरींचे शक्तीप्रदर्शन

भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी हे शरद पवारांची भेट घेवून भुसावळात दाखल झाल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. चौधरी समर्थकांनी या निमित्ताने भुसावळात शक्तीप्रदर्शन केले आहे. त्याचा उमेदवारीसाठी फायदा होतो की नाही हे काळच ठरविणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.