‘मोदींना औरंगजेब म्हणणे देशद्रोह’- एकनाथ शिंदे

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची औरंगजेबाशी तुलना केली होती. याच टीकेवरुन एकनाथ शिंदे यांनी राऊतांवर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत महत्त्वाची बैठक आणि पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाला नवी आयाम दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राम मंदिर बांधण्याचं आणि काश्मीरचं कलम 370 हटवण्याचं स्वप्न होतं. ते स्वप्न मोदींनी पूर्ण केलं. अशा आदरणीय पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं हा देशाचा अपमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना औरंगजेबाची उपमा देणं हा देशद्रोह आहे. खऱ्या अर्थाने यांची निंदा करावी तेवढी थोडी आहे. कारण औरंगजेब वृत्ती त्यांनी दाखवली. कारण आपल्याला माहिती आहे औरंगजेबाने आपल्या भावाला, वडिलांनाही सोडलं नाही. नातेवाईकांनाही सोडलं नाही. तीच औरंगजेबी वृत्ती ज्यांनी दाखवली ते महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणून त्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षित करणार?”.

“त्यांना महाराष्ट्राची जनता मतपेटीच्याद्वारे उत्तर देईल. मोदींचा अपमानाचा सूड मतपेटीतून महाराष्ट्राची जनता घेईल. देशाचे कणखर आणि धाडसी गृहमंत्री अमित शाह यांनी मोदींच्या मार्गदर्शनाखाली कलम 370 हटवलं. जे एक स्वप्न होतं, स्वप्नवत वाटत होतं ते त्यांनी करुन दाखवलं. यातून त्यांनी देशभक्तीचा परिचय दिला. त्यांना शेपूट घालणं म्हणणं ही मर्दूमकी नाही. त्याचा निषेध केला पाहिजे”, असे शिंदे म्हणाले.

“हे फोटोग्राफर, त्यांना शेपटी असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते. त्यातून त्यांना शेपटीवर जास्त प्रेम झालंय. वेळप्रसंगी शेपूट घालणारे, दिल्लीचं लोटांगण घालणारे, नोटीस आली की घाम फुटणारे, वेळेला शेपूट घालणारे कोण आहेत ? मुख्यमंत्रीपदासाठी कुणी शेपूट घातली?”, अशा खोचक शब्दांत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. याकूब मेमनचं कबर सजवणं हे कोणतं देशप्रेम आहे? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. तसेच उद्धव ठाकरेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना शिवतीर्थावर आणलं, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.