आम्ही बंड नाही तर उठाव केला – गुलाबराव पाटील

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ता संघर्ष सुरु होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत सत्ता स्थापन केली. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेतील ४० आमदार सामील झाल्याने शिवसेनेत उभी फूट पडली. यामुळे राज्यासह जळगाव जिल्ह्यातील राजकारण प्रचंड ढवळून निघाले. इतकेच नाही तर शिवसैनिकांमध्ये तीव्र रोष पाहायला मिळाला. जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेतील ५ आमदार हे शिंदे गटात सामील झाले. शिवसेनेचे खंदे समर्थक तसेच मुलुख मैदान तोफ समजले जाणारे गुलाबराव पाटील देखील शिंदे गटात सामील झाले.

आम्ही बंड नाही तर उठाव केला

आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर 164 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. यावेळी गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना चांगलेच उत्तर दिले. आम्ही बंड नाही तर उठाव केला. ही आग आजची नाही. आम्ही शिवसेना सोडली नाही. आमची चिंता नको, असे म्हणत बंडखोर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना उत्तर दिले. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर ते बोलत होते.

चहापेक्षा किटली गरम

आम्ही शिवसेनेतच आहोत, त्यामुळे निवडणुका हरण्याचा प्रश्न येत नाही. 40 आमदार फुटतात ही आजची आग नाही. आम्हाला आमचे घर सोडून येण्याची इच्छा नाही. बाळासाहेबांना आणि त्यांच्या मुलाला दु:ख देण्याची आमची इच्छा नाही. सर्व आमदार साहेबांना त्रास सांगण्यात जात होते, पण चहापेक्षा किटली गरम. आमचे फोनही घेतले जात नव्हते, अशी खंत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

माझ्यासारख्या टपरीवाल्यावर टीका

गुलाबराव पाटील म्हणाले की, हिंदुत्त्वाचे संरक्षण करणारी संघटना म्हणजे शिवसेना. 1990 वेळी भाजपसोबत पहिल्यांदा शिवसेनेने युती केली. मी १७ वर्षांचा असताना शिवसेनेत काम सुरू केले. आम्हाला पुढे निवडणूक लढायला लागेल, असे वाटलेही नव्हते. जे मिळाले ते बाळासाहेबांच्या आशिर्वादाने मिळाले. आज आम्हाला बंडखोर म्हटले जाते आहे. आम्ही बंड केलेले नाही तर उठाव केला आहे. माझ्यासारख्या टपरीवाल्यावर टीका केली गेली. मला पुन्हा टपरीवर पाठवण्याची भाषा करण्यात आली. टपरीवाला म्हणून मला हिणवले. पण लक्षात ठेवा धीरुभाई अंबानीही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे, मुख्यमंत्री रिक्षा चालवायचे हा इतिहास आहे.

आम्हाला मंत्री केले हे उपकार

गुलाबराव पुढे म्हणाले की, आम्ही काय सहजपणे आमदार झालेलो नाहीत. भगवा हातात घेऊन इथपर्यंत आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. आम्हाला मंत्री केले हे उपकार आहेत. भास्कर जाधव यांनी चिंता करण्याची गरज नाही. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवणार आहोत. आम्हाला गटारीचे पाणी, प्रेते अशा धमक्या देण्यात आल्या. आम्ही काही लेचेपेचे नाही. हातात जोर असणारा माणूस येतो आणि सत्तेत सामील होतो. एकनाथ शिंदे सत्तेसाठी गेले असे बोलण्यात आले. अहो त्यांचे चरित्र वाचा. त्यांची दोन मुले गेली तेव्हा दिघे साहेबांना त्यांना अनाथांचा नाथ हो सांगितले होते. आज बाळासाहेबही त्यांना आशीर्वाद देत असतील, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

आमचं दुख काय समजून घ्या

तसेच गुलाबराव पाटील म्हणाले की, आमचा मुख्यमंत्री असताना शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. शिवसेना रसातळाला चाललीय तिला वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला. शिवसेना संपत असेल तर ती वाचवण्याची जबाबदारी आमची आहे. फटाक्याची वात आत्ता लागलेली नाही. आमदारांची नाराजी आम्ही सांगत होतो. कोणी फोन उचलायचा नाही. अजित पवार सकाळी सहा वाजता यायचे, त्यांचा हेवा वाटायचा. एकटे एकनाथ शिंदे शिवसेना वाचवण्यासाठी फिरत होते. शरद पवारांसारखी व्यक्ती तीन वेळा जळगावमध्ये आले, अजित पवार, जयंत पाटील सगळे गेले पण मग आमचं दुख काय समजून घ्या. मोदींनी 50 आमदार असलेल्या माणसाला मुख्यमंत्री करुन बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे पाटील म्हणाले.

ज्यांची निवडून येण्याची लायकी नाही ते आम्हाला बोलतात

गुलाबराव म्हणाले की, चार लोकांच्या टोळक्याने उद्धव ठाकरेंना वहावत नेले. पट्टी बांधून तुम्हाला धृतराष्ट्राप्रमाणे सांगत आहे त्यांना दूर करा. याआधी नारायण राणे, भुजबळ, राज ठाकरे गेले तेव्हा उठाव झाला, मग आता काय झालं? आम्ही सत्तेतून बाहेर जातो तरी बंडखोर आहे म्हणता. तुम्ही आम्हाला पुन्हा घरट्यात, मातोश्रीवर या सांगायला हवे होते. ज्यांची निवडून येण्याची लायकी नाही ते आम्हाला बोलतात, असा प्रत्यक्ष टोला त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.