मी गुलाबराव पाटलांचा चहाता आहे

0

जळगाव विशेष प्रतिनिधी 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांची मुख्य जाहीर सभा मुक्ताईनगरला असली तरी त्याआधी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी या गावात कार्यक्रम झाला. या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुलाबराव पाटील यांचे तोंड भरून कौतुक केले.

मंत्री गुलाबराव पाटील कडवट शिवसैनिक आहेत. त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना वाढवली, फुलवली. शिवसेनेचे ते मुलुख मैदान तोफ आहेत. दरवर्षीच्या दसऱ्या मेळाव्याला श्रोत्यांमध्ये चैतन्य निर्माण करणारे भाषण गुलाबराव पाटील करायचे. मी सुद्धा गुलाबरावांचा एक चाहता आहे. परंतु गुलाबरावांचे वर्चस्व सहन झाले नाही. त्यांचे पाय खेचण्याचे काम केले गेले. दसरा मेळाव्यातील त्यांच्या भाषणाची लोकप्रियता वाढत असल्याने दसरा मेळाव्यात होणारे त्यांचे भाषण रद्द केले गेले. गुलाबराव यांच्या तोंडात सरस्वती आहे, हे मान्य करावेच लागेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर भाषणात कौतुक करून उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला मारला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, माझ्या ठाणे जिल्ह्यात विधानसभा लोकसभा निवडणुकीत मी स्वतः प्रचार सभेसाठी त्यांना बोलावून घेतो. ज्या गुलाबरावांनी शिवसेना वाढवली, त्यांना पान टपरीवाला, चुना लावणारा म्हणून त्यांची हेटाळणी केली गेली. हे दुर्दैव म्हणावे लागेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.