Saturday, January 28, 2023

मुख्यमंत्र्यांचे मुक्ताईनगरात शक्ती प्रदर्शन : जिल्ह्याला मात्र ठेंगा

- Advertisement -

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुक्ताईनगर येथे एमआयडीसीची निर्मिती होऊन परिवहन मंडळाच्या जागेत व्यापारांच्या असलेल्या मागणीनुसार व्यापारी संकुलांची निर्मिती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर येथे झालेल्या जाहीर सभेत केली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर गेल्या अडीच महिन्याच्या कार्यकाळात जिल्ह्यातील पहिल्या सभेचे काल मुक्ताईनगर येथे क्रीडा संकुलाच्या मैदानात आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

मुक्ताईनगरला एमआयडीसी

- Advertisement -

मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार तथा शिवसेनेचे सहयोगी आ. चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या परिश्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुक्ताईनगर येथे जाहीर सभा घेऊन शक्तिप्रदर्शन केले. या सभेला मुख्यमंत्री शिंदे यांनी मुक्ताईनगरला एमआयडीसी आणणार, त्याचप्रमाणे मोठ्या व्यापारी संकुलांची संबंधित जागेवर निर्मिती करणार असल्याचे आश्वासन दिले.

एकूणच आ. चंद्रकांत पाटलांनी प्रस्तावनेत केलेल्या काही मागण्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला असला तरी जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या मूळ महत्त्वाच्या घोषणेपासून मात्र श्रोते वंचित राहिले. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त मुक्ताईनगर आणि पाळधी या दोनच ठिकाणी आवश्यक त्या घोषणा करून सभा घेतलेल्या गावांची मर्जी राखलेली दिसून आली. मात्र जिल्ह्याला ठेंगा दाखवत कोणतीही जिल्ह्याच्या सोयीची योग्य अशी घोषणा केली नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जिल्ह्याकडे कानाडोळा 

दरम्यान मुक्ताईनगरच्या सभेआधी पाळधी येथे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटलांच्या गावात घेतलेल्या सभेत धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय म्हणून मान्यता देण्यात आली. यासोबतच विश्रामगृहाच्या कामाचे भूमिपूजन आणि आसोदा येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक तसेच धरणगावातील बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाचा मार्गही मोकळा करणार असल्याची सांगितले. मात्र जिल्हाभरात असलेल्या इतर समस्यांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कानाडोळा केला असल्याचे दिसून आले.

गुलाबराव मंत्री तरी जिल्ह्याला मदत नाही..!

जिल्ह्याला आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या घोषणेला मुख्यमंत्र्यांनी डावलले असून माजी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यात असलेल्या समस्यांची माहिती दिली नाही काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गुलाबराव पाटील हे मंत्रीपदावर विराजमान आहेत. एकनाथ शिंदे यांच्या विशेष मर्जीतले म्हणूनही त्यांना ओळख आहे. मात्र एवढे असताना मंत्र्यांच्या मतदारसंघात फक्त एखाद्या विश्रामगृहाचे उद्घाटन एवढेच अपेक्षित नाही.

मंत्रीपदावर असताना गुलाबराव पाटलांनी जिल्ह्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून भरघोस अशी मदत मिळवणे अपेक्षित होते. मात्र ते गुलाबराव पाटलांना जमलेले दिसून आले नाही. याउलट मुक्ताईनगर येथील अपक्ष आमदार म्हणवले जाणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी मात्र आपल्या मतदारसंघात फुल न फुलाची पाकळी मदत मिळवल्याचे दिसून येते. याबाबतीतही चंद्रकांत पाटील हे गुलाबराव पाटलांपेक्षा उजवे ठरल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

दरम्यान राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली. मात्र ’५० खोके एकदम ओके’ या घोषणांनी मुख्यमंत्र्यांसह सभेला आलेल्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. या कार्यकर्त्यांनी छापील स्वरूपात ’५० खोके एकदम ओके’ असे पांढऱ्या टी-शर्टवर लिहिलेले आढळून आले. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याचा निषेध म्हणून हे आंदोलन केले असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

काश्मीरमधील 370 कलम हटवणे, अयोध्येतील राममंदीर हे बाळासाहेबांचे स्वप्न आज भाजपने पूर्ण केले. तर मग आम्ही त्यांच्यासोबत गेलो तर कोणता गुन्हा केला? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेत उपस्थित केला. सोबतच  जनतेने आम्हाला संधी दिली आहे. आपले जे प्रेम मिळत आहे, ते प्रत्येकाच्या नशिबात नसते. त्या प्रेमातून उतराई होण्यासाठी तुमच्या समस्या, प्रश्न हे शिवसेना-भाजप युतीचे सरकार सोडवल्याशिवाय राहणार नाही. ही खात्री मी आज देतो, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे