सलमानच्या घरावर गोळीबार करणार्‍या आरोपीची आत्महत्या

0

मुंबई – लोकशाही न्यूज नेटवर्क
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी अनुज थापन याने आज तुरुंगात गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या आरोपीला गंभीर अवस्थेत तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अनुज थापन व सोनू चंदर या दोघांना अटक केली होती. यापैकी अनुज थापन याने आज पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातील लॉकअपमध्ये चादरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब तुरुंगातील कर्मचार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्याला लगतच्या जी. टी. रुग्णालयात हलवले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अनुज थापन याच्यावर हल्लेखोरांना शस्त्र उपलब्ध करून देण्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला पंजाब येथे अटक केली होती. त्याला ठार केले की त्याने आत्महत्या केली हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सलमानच्या घरावर 14 एप्रिल 2024 रोजी पहाटे 2 च्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केला होता. हल्लेखोरांनी एकूण 4 गोळ्या सलमानच्या घराच्या दिशेने झाडल्या. पोलिसांनी या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तपास सुरू केला होता. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी गुजरात व पंजाबमधून प्रत्येकी 2 अशा एकूण 4 जणांना अटक करत ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केली. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सलमानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली होती. घटनेचा सखोल तपास करून आरोपींना कठोर शासन करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली होती. दरम्यान, सलमान खानला मागील अनेक वर्षांपासून लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.