जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क;
तालुक्यातील पळासखेडा बु. येथे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी करणार्या मुलाने बापाला तिक्ष्ण हत्याराने वार करुन खुन केल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पळासखेडा बु. येथील खासगी नोकरीवर ड्रायव्हर म्हणून काम करणारे बाजिराव राजाराम पवार वय (५५) हे आपल्या पत्नी मुलगी व मुलगा सुमित बाजिराव पवार यांच्या समवेत वास्तव्यास होते. दिनांक १६ वार गुरुवारी बाजिराव पवार यांची पत्नी व मुलगी हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते तर मुलगा सुमित तसेच मयत बाजिराव पवार हे दोघेच घरी होते. मुलगा सुमित याला दारुचे व्यसन असल्याने त्याने बापाकडे दारुपिण्यासाठी तगादा लावला.
परंतु पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला जाऊन सुमित याने मागचापुढचा विचार न करता तिक्ष्ण हत्याराने बापावर माने जवळ वार केला. वार खोलवर गेल्याने बाजिराव पवार हे क्षणार्धात जमिनीवर कोसळले गंभीरपणे जखमी अवस्थेत गावकऱ्यांनी त्यांना जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
परंतु रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. आरोपी सुमित पवार यास अटक करण्यात आली असुन मयताचे नातेवाईक निलेश सुनील गायकवाड यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक रोटे हे करीत आहेत.