जिल्ह्यातील मंत्र्यांच्या यादीत तिसरे नाव कोणाचे ?

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी अनपेक्षितपणे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री पदावर दावा करणारे भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सर्वांनाच धक्का दिला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा कारभार स्वीकारला राज्यपालांनी बोलविलेल्या 3 व 4 जुलैच्या विशेष अधिवेशनात विश्वास दर्शक ठराव हा केवळ औपचारिकता ठरणार आहे. कारण शिंदे गटाचे 50 आणि भाजपचे 120 आमदार मिळून 170 आकडा होतो. बहुमतांसाठी 144 ची मॅजिक फिगर आहे. एकूण बहुमतापेक्षा 26 आमदार जास्तीचे आहेत. त्यामुळे विश्वास दर्शक ठरावापेक्षा आता शिंदे मंत्रिमंडळाच्या विस्तारा संदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

शिंदे गटातील आमदार वेगवेगळी फिल्डिंग लावत आहे. तिकडे भाजपमध्येही मंत्री बनणारे आक्रमक झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळणार तसेच त्यांच्या गटाला कॅबिनेट आणि पाच राज्यांची अशा फॉर्म्युलाची चर्चा होती. तथापि शिंदे मुख्यमंत्री बनल्यामुळे या फॉर्मुल्यात बदल होतो काय ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. जळगाव जिल्ह्यासाठी भाजपचे माजी मंत्री व माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचा मंत्रिमंडळात निश्चित समावेश होणार यात शंका नाही. त्यानंतर विद्यमान पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे एकनाथ शिंदेंच्या जसे जवळचे आहेत तेवढेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने त्यांचे पारडे जड आहे. म्हणून गुलाबराव पाटील यांच्या मंत्रिमंडळात समावेश निश्चित मानला जात आहे.

या दोन कॅबिनेट मंत्र्यांबरोबर तिसऱ्या राज्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळात समावेश होणार का ? याबाबतही जोरदार चर्चा होत आहे. आणि या चर्चेला तसा आधार सुद्धा आहे. कारण जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्वच्या सर्व पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडात सुरुवातीपासूनच सामील झालेले होते. पाच आमदारांपैकी मुक्ताईनगरचे आमदार अपक्ष म्हणून निवडून आलेले असले तरी ते शिवसेनेचे सहयोगी सदस्य बनले होते. पाच पैकी पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील हे तीन वेळा शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आलेले सीनियर आमदार आहेत. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि चिमणराव पाटलांचे राजकीय मतभेद असल्याचे सर्वश्रुत आहे. म्हणून चिमणराव पाटलांना राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून स्थान देऊन त्यांची नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूर करू शकतात, असे बोलले जाते. त्यामुळे त्यांचा शिंदे मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश होऊ शकतो.

तिसरे पाचोरा भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील हे दुसऱ्यांदा निवडून आले असून, ते तरुण तडफदार आणि अभ्यासू आमदार म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे किशोर पाटलांवर विशेष प्रेम आहे. एकनाथ शिंदेंचे पाचोरा कनेक्शन नव्याने सांगण्याची गरज नाही. गेल्या अडीच वर्षांच्या ठाकरे सरकारच्या कालावधीत नगर विकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी पाचोरा शहराच्या विकासासाठी भरभरून निधी दिला आहे. त्यामुळे एक तरुण चेहरा म्हणून शिंदेंकडून आमदार किशोर पाटलांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते, असे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यमंत्री मंडळात राज्यमंत्री म्हणून आमदार किशोर पाटलांचा समावेश होऊ शकतो.

चोपड्याचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या धर्मपत्नी लताताई सोनवणे यांना तांत्रिक अडचणीमुळे तिकीट द्यावे लागले. आमदार म्हणून त्यांना विशेष अनुभव नाही. त्यामुळे त्यांच्या नावाचा मंत्री पदासाठी विचार होणार नाही. तथापि मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे पहिल्यांदा आमदार झाले असले, तरी त्यांचा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या विरोधात वापरण्यासाठी होऊ शकतो. म्हणून त्यांना जर राज्यमंत्री केले तर एकनाथराव खडसेंना ते जिल्ह्यात आणि मतदारसंघात चांगल्या प्रकारे शह देऊ शकतात. म्हणून त्यांच्या नावाचाही राज्यमंत्री म्हणून विचार होऊ शकतो.

पारोळ्याचे चिमणराव पाटील, पाचोऱ्याचे  किशोर आप्पा पाटील आणि मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील हे तिघेही मंत्रिमंडळात समावेश व्हावा म्हणून प्रयत्नशील आहेत. तीन मंत्री पदे जिल्ह्याला देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला तर, या तीन नावांसाठी कोणते निकष लावून मंत्रिमंडळात घेतले जाते हे बघावे लागणार आहे.

मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच आमदार झाले असले तरी ते शिंदेप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा विशेष मर्जीतले आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक असलेले एकनाथ खडसे यांना शह देणारा हवा आहे. आमदार चंद्रकांत पाटील हे जरी अपक्ष आमदार असले आणि ते शिवसेनेचे सहयोगी सदस्य बनले असले, तरी आगामी काळात अथवा 24 च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपचे उमेदवार असू शकतात. म्हणून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची चंद्रकांत पाटलांवर विशेष मर्जी असल्याचे बोलले जाते. परंतु चंद्रकांत पाटलांना राज्यमंत्री केल्यास जिल्ह्यातील शिवसेनेचे शिंदे गटातील दोन निष्ठावान आमदार नाराज होतील. याबाबतच्या सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांना विचार करावा लागेल.

जिल्ह्यातील तिसरा मंत्री झालाच तर तो शिवसेनेचा शिंदे गटातील राहील. त्यामुळे या तीन नावांपैकी राज्य मंत्रिमंडळ मंडळात कोणाचा समावेश होऊ शकतो ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. जळगाव जिल्ह्याला तीन मंत्री पदे येऊन जळगाव जिल्ह्यातील विरोधकांची ताकद क्षीण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वर्चस्व मिळवून शिंदे फडणवीस गटाची सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने व्यूहरचना आखण्यात येईल. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार ? हा ही एक महत्त्वाचा मुद्दा शिंदे सरकार पुढे राहणार आहे. कारण पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यावर चांगलाच दबाव राहिलेला आहे. त्यांच्या कारकिर्दीत गेल्या 35 वर्षे विरोधकांची सत्ता असलेली जळगाव महानगरपालिकेवर भाजपने मोठ्या मताधिक्याने सत्ता काबीज केली होती. म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन केले जातील असे चित्र दिसते.

Leave A Reply

Your email address will not be published.