शरद पवारांना मोठा धक्का; महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. राजकारणात रोज नवे धक्के बसत आहेत. त्यात शरद पवारांना आणखी एक धक्का बसला आहे. महाराष्ट्रात सत्ताबदल झालेला असतानाच आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे.

भारतीय कुस्ती संघटनेने नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेतला आहे. भारतीय कुस्ती संघटनेचा हा निर्णय शरद पवारांसाठी

धक्का आहे. कारण ते महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून राज्यात कुस्ती स्पर्धा आयोजित करणे आणि अन्य निर्णय घेतले जातात. राज्यात कुस्ती संचलनासाठी पुढच्या काही दिवसात ॲड हॉक समितीची निवड करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीसह इतर निर्णय घेतले जातील.

बरखास्त का केलं ?

भारतीय कुस्ती संघटनेच्या काही प्रस्तावांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, हे सुद्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यामागचं एक कारण आहे. त्याशिवाय राज्यातील मल्लांकडूनही राज्य कुस्तीगीर परिषदेबाबत तक्रारी आल्या होत्या. 15 वर्षाखालील गटासाठी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यास महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, असं पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. 23 वर्षाखालील गटासाठी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यासही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद तयार झाली नाही. ही बरखास्ती मागची काही कारणं आहेत.

शरद पवारांना मोठा धक्का

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची बरखास्ती हा शरद पवारांसाठी धक्का आहे. कारण ते या परिषदेचे अध्यक्ष होते. अलीकडेच महाराष्ट्रात सत्ताबदल झाला आहे. शरद पवार यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच सरकार कोसळलं. त्यांचा पक्ष सत्तेत प्रमुख भागीदार होता. त्या झटक्यानंतर हा दुसरा धक्का मानला जातोय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.