विकासाच्या निधीवरून तू-तू, मै-मै कशासाठी ?

0

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा बालेकिल्ला होय. तथापि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथराव खडसे यांना भाजपने उमेदवारी नाकारून मुलगी ॲड. रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एकनाथराव खडसेंना निवडणूक लढविण्याची ऑफर दिली होती. परंतु त्यावेळी ती त्यांनी नाकारली. मुलगी रोहिणीला भाजपतर्फे निवडून आणण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. परंतु भाजपच्या ॲड. रोहिणी खडसे विरूध्द शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकजुटीने अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला.

भाजपमधील एक गटाने सुध्दा चंद्रकांत पाटील यांना छुपा पाठिंबा दिला. त्यामुळे अवघ्या अडीचशे तीनशे मतांनी चंद्रकांत पाटील काठावर विजयी झाले. निवडणुकीनंतर तीन पक्षाचे महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर मुळात शिवसैनिक असलेले चंद्रकांत पाटलांनी आपला शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. पुढे एकनाथराव खडसे भाजममधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत ॲड. रोहिणी खडसेंचा पराभव करणारे आ. चंद्रकांत पाटील हे दोघे महाविकास आघाडीचे घटक बनले.

तथापि आ. चंद्रकांत पाटील आणि एकनाथराव खडसे यांचेत गेल्या अनेक वर्षापासून राजकीय वैर आहे. विधानसभेच्या अनेक निवडणुका शिवसेनेच्या तिकीटावर लढविल्या. परंतु आ. चंद्रकांत पाटील हे विजयी होऊ शकले नाहीत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत खडसेंच्या दुर्दैवाने भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली. भाजप आणि विशेषत: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खडसे यांचेत बिनसले. ॲड. रोहिणीला उमेदवारी भाजपने नावाला दिली. त्यामुळे अशा परिस्थितीत आ. चंद्रकांत पाटील यांची लॉटरी लागली. ते आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी झपाटून कामाला लागले.

कारण मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून मिळालेली आमदारकी पुढे टिकवून ठेवायची असेल तर आ. चंद्रकांत पाटलांना मतदारसंघात विकासकामे करण्याशिवाय पर्याय नाही, आ. चंद्रकांत पाटलांच्या सुदैवाने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शिवसेनेचे असल्यने आ. चंद्रकांत पाटलांसाठी निधी मिळविण्यासाठी राजमार्ग आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. परंतु आमदारकीची निवडणूक होऊन सुमारे अडीच वर्षे होत आली. या अडीच वर्षात आ. चंद्रकांत पाटील आणि एकनाथराव खडसे यांच्यात कधीही सलोख्याचे वातावरण दिसून आले नाही. दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. जेणेकरून दोन्ही नेते मुक्ताईनगर मतदारसंघाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे मतदारसंघातील जनतेला दाखवून देण्याचा एनकेन प्रयत्न करताहेत.

आ. चंद्रकांत पाटील आणि एकनाथराव खडसे यांच्यातील विळ्या भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. एकनाथराव खडसेंना वाटते की, मुक्ताईनगर मतदारसंघावर आपलीच हुकूमत असली पाहिजे. आगामी विधानसभा निवडणुकीत आपण अथवा आपण ज्यांना उमेदवारी देऊ ती व्यक्ती निवडून आली पाहिजे. आ.चंद्रकांत पाटलांच्या विरोधात सातत्याने खडसेंकडून टीका -टिप्पणी होत असते. जेणेकरून आगामी निवडणुकीत आ.चंद्रकांत पाटील प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक लढविणार असल्याने आपलेच वर्चस्व सिध्द करण्याचा खडसेंचा प्रयत्न असतो असे एकंदरीत दिसून येते.

आ. चंद्रकांत पाटील यांनीही मिळालेली संधी आता हातची घालवायची नाही. त्या संधीचं सोनं करायचं हा चंग बांधलेला आहे. त्यामुळे जिथे जिथे खडसेंवर टीका करण्याची संधी मिळते तेव्हा पाटील त्यांचेवर कडाडून टीका करीत असतात. मध्यंतरी ॲड. रोहिणींवर झालेला हल्ला गाजला. त्याबाबत आ. चंद्रकांत पाटलांकडे बोट दाखवण्यात आले. परंतु आ. चंद्रकांत पाटलांनी त्यातून सहीसलामत आपली बाजू भक्कमपणे पटवून दिले.

आ. चंद्रकांत पाटील आणि एकनाथराव खडसे यांचेतील राजकीय भांडण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मिटविणे आवश्‍यक आहे. दोघांमध्ये समझौता घडवून आणावा. दोघेही नेते मुक्ताईनगर मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील असतील तर त्याचा फायदा मुक्ताईनगरच्या जनतेचाच होणार आहे. आगामी निवडणुकीला लक्ष्य ठेवून दोघे भांडत असतील तर एकनाथराव खडसेंना राष्ट्रवादीतर्फे विधानपरिषदेवर घेऊन आमदार करावे.

महाविकास आघाडीची युती झालीच तर आ. चंद्रकांत पाटलांना येत्या निवडणुकीत आमदारकीची निवडणूक लढविण्याची संधी दिली तर त्यांचेतील होणारे भांडण आपोआप कमी होईल. ॲड. रोहिणींसाठी सूतगिरणी, मुक्ताई साखर कारखाना आहेच. त्या माध्यमातून त्यांनी आपले प्रतिनिधीत्व सिध्द करावे. तसे नाही झाले तर दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बोदवड नगरपंचायत निवडणुकीचे उदाहरण ताजे आहे. भाजपसारखा राष्ट्रीय स्तरावरील पक्ष शिवसेनेच्या आ. चंद्रकांत पाटलांच्या पॅनेलला छुपा पाठिंबा देऊन राष्ट्रवादीचे खडसे यांचे खच्चीकरण केलेच ना. तशाच प्रकारच्या कृती आगामी निवडणुकीतून टाळायच्या असतील तर स्वत: एकनाथराव खडसे यांनी समजदारीची भूमिका घ्यावी, कारण ते वरिष्ठ व अनुभवी नेते आहेत. त्यामुळे तरूण आमदाराच्या विरोधात तू-तू, मै-मै करणे हे एकनाथराव खडसेंना शोभणारे नाही. त्यांनी आता वरच्या दर्जाचे राजकारण करावे व तरुणांना संधी द्यावी. एवढेच या निमित्ताने सूचवावेसे वाटते.

Leave A Reply

Your email address will not be published.