तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो I

0

करुणाष्टक- 16

असंख्यात ते भक्त होऊनि गेले I तिंही साधनांचे बहु कष्ट केले II
नव्हे कार्यकर्ता भुमी भार जालो I तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो II

समर्थांचा “रामराया” बरोबर भरपूर संवाद झाला, कोठेही भिडभाड न ठेवता मनमोकळेपणे आपल्या मनाचे पदर त्यांनी उलघडून मांडले. त्यात मनाचे अचपळपण, मनाचे गुज, मनाचा करंटेपणा, मनाची व्यथा सर्व काही आले. ‘रामराया’ हा त्यांचा प्राण होता. रामा विषयीचे निस्वार्थी, उत्कृष्ट प्रेम व आर्तता इथं दिसते. आपल्या मनाचे चित्र रेखाटताना ते स्वतः रडले व वाचकांनाही रडविले. पण त्यांचं रडणं प्रपंचासाठी नव्हते. समर्थ विश्वासाठी व माणसाच्या सर्व प्रकारच्या दारिद्र्यासाठी रडले.

पण त्यांचा करुण धावा एवढाच हेतू नव्हता. तर ते पुढे निघालेत त्यांना उत्तम भक्त, उत्तम दास, उत्तम साधक व्हायचे आहे. ते संत होते. पण त्यांचा मन:पिंड समाजसुधारणेचा होता. त्यांना कार्यकर्ता व्हायचे होते. ते त्यांचे ध्येय व स्वप्न होते. त्यामुळे करुणाष्टकाला नकळत मिळालेली कलाटणी इथे जाणवते. त्यांची जाणीव उदात्त, उत्तुंग होऊ लागली आहे, डोहा सारखे अथांग व खोल होत आहे व ते म्हणू लागलेत- “तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो” सर्वश्रेष्ठ भक्तांची मांदियाळी “आदर्श” म्हणूनच त्यांच्या समोर आहे. त्यात सनकादिक, नारद, व्यास, वाल्मिकी, भक्त प्रल्हाद, पार्थ पराशर, रूक्मांद, हनुमान, बाळ ध्रुव नारदांचे भक्तीरेव गरियेसी ही गर्जना त्यांना आठवत आहे. या सर्वश्रेष्ठ भक्तांचे नुसते स्मरण होताच कोणताही जीव शरणागत व्हावा, नतमस्तक व्हावा.

समर्थांसारखे भाग्यवंत नुसते स्मरण करून थांबत नाही तर श्रेष्ठ भक्त होण्यासाठी त्यांनी साधनेचे जे उदंड कष्ट केलेत ते त्यांना आठवतात. हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्मलेल्या प्रल्हाद त्याला कड्यावरून खाली लोटले तरी तो विष्णू स्मरण करीतच राहिला. बाळ ध्रुव घरादाराचा त्याग करून तप केले व अढळपण प्राप्त करून घेतले तर राजघराण्यातील साध्वी मीरेने गोपाल कृष्णासाठी सर्वस्व त्याग केला. या सर्वच भक्तांचे कष्ट त्यांनी आपल्या दैवता विषयीचे अपार ओढ जिद्द व तळमळ, स्वरूप जगण्यासाठी आकांक्षा या सर्वांची आठवण करून समर्थ म्हणतात- “असंख्यात ते भक्त होऊन गेले” व ते स्वतः या मार्गावरून चालण्यास सिद्ध झाले. टाकळी येथे बारा वर्षे त्यांनी घोर तप केले. त्यांच्या पायाला पाण्यातील मासे चावले होते पण त्यांचे नामस्मरण, साधना खंडित झाली नव्हती.

कोयना नदी जवळ हेळवाकची घळ आहे. पुढेही तिथं घनदाट अरण्य आहे, वाघ व अस्वल अशी श्वापदं होती. उन्हाळ्यात थंडी असते. अशा घनदाट गुहेत समर्थांनी चातुर्मास केला. पुढे त्यामुळे त्यांना सीतलाई झाली. समर्थांनी उदंड देहदंड सोसला देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी म्हणून साधनेत इंद्रियदमनाला त्यांनी महत्व दिले. प्रत्येक सद्गुरूंनी शिष्याला इंद्रियदमन करण्यास आज्ञा द्यावी अशी त्यांची धारणा होती.

देवाच्या सख्यत्वासाठी, प्राण वेचण्यासाठी समर्थ तयार होते. आपण काय, आज असो उद्या नसो पण देवाचे कार्य अखंड चालत राहिले पाहिजे म्हणून त्यांना कार्यकर्ता व्हायचे होते. केवळ व्यक्तिगत मुक्ती त्यांना अपेक्षित नव्हती. दास्यभावाने देवाचे वैभव सांभाळावे असे त्यांना वाटे. भंगलेली देवळे बांधावीत, धर्मशाळा बांधाव्यात, मोडलेली सरोवरे बांधावीत, देवस्थानांचा उद्धार करावा, देवाच्या जयंत्या कराव्यात, महोत्सव करावेत, देवाचे वैभव वाढवावे की स्वर्गीचे देव तटस्थ होतील आणि हे जर होणार नसेल तर मग जन्माला येऊन काय उपयोग ? “व्यर्थ भूमी भार होऊन का मी राहू ?” असा प्रश्न पडून ते अंतर्मुख होत.

पण समर्थांनी समर्थपणे हे स्वप्न पूर्ण केले. अनेक मारुती मंदिरे बांधली. मठ स्थापना करून महंती महंत करावे असे त्यांनी करून ठेवले. दासबोध ग्रंथ लिहून ठेवला. त्यांनी उदंड कष्ट करून कार्य केले. आपल्याला त्यांच्या ऋणातून थोडसं उतराई व्हावयाचे असेल तर त्यांच्या आवडीच्या तीन साधना आपण करूयात. दासबोध या ग्रंथाचे श्रवण, एकांत काळी दिवसाकाठी अर्धा तास चिंतन व तद्नुसार त्याचा ध्यास घेऊन थोडं थोडं आचरण करण्याचा प्रयत्न करूया व या भूतलावर, भूमीवर भूमी भार न होता राहण्यास सत्पात्र होऊया .”मी कर्ता ऐसे म्हणशी, तेणे तू कष्टी होशी I राम कर्ता म्हणता पावशी यश, कीर्ती, प्रताप II” हे सुंदर समर्थ वचन हृदयी ठेवूया.

II जय जय रघुवीर समर्थ II

लेखिका- भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.