प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा सनसनाटी आरोप
लोकशाही न्युज नेटवर्क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार हे महाराष्ट्राच्या हिताचे काम करीत नाही. त्यांना फक्त गुजरात राज्याची काळजी असून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत यायचे आणि महाराष्ट्राला लुटायचे आणि सुरतला वाटायचे असे उलटे काम हे सरकार करीत असल्याचा सनसनाटी आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
नाना पटोले हे नाशिक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. सध्याचे केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार आणि त्यांच्या कामकाजावर त्यांनी तीव्र शब्दांमध्ये टिका केली.
यावेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, आमदार लहु कानडे, नाशिकचे प्रभारी ब्रिजकिशोर दत्त, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, डॉ. तुषार शेवाळे, काँग्रेस प्रतोद डॉ. हेमलता पाटील, शाहू खैरे, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष विजय राऊत, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, राजाराम पानगव्हाणे, माजी नगरसेवक राहुल दिवे, वसंत ठाकुर, वत्सलाताई खैरे, बबलु खैरे, माजी नगरसेविका आशाताई तडवी आदी उपस्थित होते.
सध्या राज्य सरकार महाराष्ट्राची नव्हे तर गुजरातची काळजी घेत आहे. त्यांनी वाघ, बिबटे हे प्राणीही सोडले नाहीत. राज्याचे उद्योग, रोजगार, प्रकल्प सगळं ते गुजरातला देण्यात धन्यता मानत असून त्याकरिता अतिशय प्रामाणिकपणे त्यांचे काम सुरु आहे. त्याबाबत त्यांना जराही खंत, कमीपणा वाटत नाही, हे अतिशय खेदजनक असल्याचे त्यांनी म्हटले.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नागपूर आणि नाशिक मतदारसंघात उमेदवारीवरून झालेल्या गोंधळाबाबत त्यांनी स्पष्ट संदेश दिला. ते म्हणाले, आम्ही दोन्ही निर्णय प्राप्त परिस्थितीत धोरण म्हणून घेतले आहे. ते कोणी एकट्याने नव्हे तर पक्षाने घेतलेत. मी म्हणजे पक्ष नव्हे, आम्ही सर्व म्हणजे काँग्रेस पक्ष आहे. याउपर कोणी पक्षाचे धोरण सोडून बंडखोर उमेदवारांना मदत किंवा सहानुभूती दाखवत असल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल हा माझा इशारा आहे. असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.